वंजारवाडीच्या नागरिकांचे सामूहिक आत्मदहन रद्द
![वंजारवाडीच्या नागरिकांचे सामूहिक आत्मदहन रद्द](https://osmanabadlive.com/static/c1e/client/83983/uploaded/c936c6d54279dc7775b48135a249ba67.jpg)
उस्मानाबाद- भूम तालुक्यातील वंजारवाडी येथे ३३ केव्ही सबस्टेशनचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंताकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती.परंतू काम करण्यास टाळाटाळ होत असल्याने त्यासाठी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र माजी आमदार राहुल मोटे व बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांच्या मध्यस्थीने विद्युत वितरण कंपनीचे औरंगाबाद येथील कार्यकारी उपसंचालक गिते व उस्मानाबाद येथील अधीक्षक अभियंता यांच्या बरोबर झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे काम लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिल्यामुळे ते आत्मदहन रद्द करण्यात आले आहे. सदरील आत्मदहन रद्द करण्यात आल्याचे दि. १ मे रोजी देण्यात आलेल्या लेखी निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, भूम तालुक्यातील वंजारवाडी येथे 33 केव्ही सबस्टेशन काम चालू करण्यासाठी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र ते काम करण्यासाठी सतत टाळाटाळ केली जात असल्यामुळे कंटाळलेल्या नागरिकांनी दि.१ मे रोजी उस्मानाबाद येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीने दि. २६ एप्रिल रोजी पत्र पाठवून हे काम तातडीने चालू करण्यात येईल, असे समाधानकारक आश्वासन देण्यात आले आहे.
याबाबत माजी आ. राहुल मोटे व बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्या बरोबर सकारात्मक चर्चा केली. चर्चे अंती हे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल असे ठोस आश्वासन कार्यकारी अभियंता यांनी दिल्यामुळे ते सामुदायिक आत्मदहन रद्द घेण्यात आले आहे. या निवेदनावर दिंडोरीचे सरपंच बाळासाहेब गपाट, माजी उपसरपंच रामभाऊ गपाट, वंजारवाडीचे सरपंच प्रभाकर शेळके, उपसरपंच नंदकुमार शिंदे, दिंडोरीचे उपसरपंच अभिजीत गपाट, हाडोंग्रीचे सरपंच सुधीर शिरसागर, खंडू जगदाळे (हिवरा), महावीर सागळे, आश्रू गवारे, हनुमंत कातुरे व महादेव वाघमारे यांच्या सह्या आहेत.
राहुल मोटे व बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर आले मदतीला धावून !
वंजारवाडी येथे प्रस्तावित असलेले ३३ केव्ही सबस्टेशनचे काम हे गेल्या अनेक महिन्यापासून रखडून पडलेले आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी व गावकऱ्यांची देखील विजेची मागणी पूर्ण होत नव्हती. विजेअभावी, शेतातील विहीर बोअर व तलावात पाणी असताना देखील ते पिकांना उपसून पिकांना देता येत नव्हते. या सबस्टेशनचे काम तात्काळ सुरू करून ते पूर्ण करावे यासाठी या परिसरातील नागरिक महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करीत होते.
मात्र त्यास प्रतिसाद मिळत नव्हता ही बाब माजी आमदार राहुल मोटे यांना समजताच त्यांनी बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांना व शेतकऱ्यांसह उस्मानाबाद येथील अधीक्षक अभियंता कार्यालय गाठून औरंगाबाद येथील उप - कार्यकारी संचालक गीते व उस्मानाबाद विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याबरोबर दि. १ मे रोजी चर्चा करून हे काम तत्काळ सुरू करण्याची मागणी लावून धरताच अधिकाऱ्यांनी ती मागणी मान्य केली आहे. त्यामुळे मोटे पुन्हा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत.