मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा

उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी जलदगतीने काम करणे म्हणजेच स्वातंत्र्य सैनिकांना खरी आदरांजली

 
s
-  पालकमंत्री शंकरराव गडाख

उस्मानाबाद -  मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी आयुष्यभर क्रियाशील राहून काम केले आहे. स्वातंत्र्य मिळवण्याबरोबरच मराठवाड्याचा समग्र विकास व्हावा हाही त्यांचा ध्यास होता. तो ध्यास पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्य शासनासह प्रयत्न करीत आहेच त्याचबरोबर आपण सर्वांनी मिळून करु या. उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी जलद गतीने करणे म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांना खरी आदरांजली आहे, असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी आज येथे केले.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आयोजित केलेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण केल्यानंतर शुभेच्छा संदेशात त्यांनी हे प्रतिपादन केले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, जि.प.च्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हा स्वातंत्र्य सैनिक गौरव समितीचे अध्यक्ष नामदेवराव माने, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक नायगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आदी उपस्थित होते.

हैदराबाद  संस्थान  निजामाच्या  जुलमी राजवटीतून  मुक्त करण्याच्या लढ्याचे नेतृत्व करणारे स्वामी  रामानंद तीर्थ  यांच्या  जिवितकार्याची  पायाभरणी  आपल्या  जिल्ह्यातील  हिपरग्याच्या राष्ट्रीय  शाळेत झाली, याची आजच्या दिनानिमित्ताने  आपल्याला  आठवण  येणे स्वाभाविक  आहे. स्वामीजींच्या  नेतृत्वाखाली  निजाम  राजवटीच्या  गुलामगिरीविरुध्द  लढा देण्यात आला, असे सांगून श्री.गडाख म्हणाले, गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब  परांजपे,  दिगंबरराव बिंदू, गंगाप्रसाद  अग्रवाल, देवीसिंहजी  चव्हाण, भाई उध्दवराव पाटील, दिगंबरराव देशमुख, कॅप्टन  जोशी अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. त्यांना महिला स्वातंत्र्य सैनिकांनीही निडरपणे साथ दिली होती. या सर्वांना पालकमंत्र्यांनी विनम्र अभिवादनही केले.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2020-21 करिता जिल्ह्यास 260 कोटी 80 लक्ष रुपये मंजूर निधीपैकी 259 कोटी 40 लक्ष रूपये इतका खर्च करण्यात आला आहे. खर्चाची टक्केवारी  99.46 टक्के इतकी आहे. जिल्हा स्तरावर नियोजन केले जात असले तरी तालुका निहाय समप्रमाणात कामांचे वाटप करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे, असे सांगून पालकमंत्री श्री.गडाख म्हणाले की, नीति आयोगाने  विकसित  केलेल्या डॅशबोर्डच्या आधारे कृषी आणि पाणीस्त्रोत या क्षेत्रात जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरीद्वारे डिसेंबर 2020 मध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. याबद्दल जिल्ह्यास नीति आयोगाकडून 3 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. बक्षीस स्वरुपात मिळालेली सर्व रक्कम  शेतकऱ्यांसाठी खर्च करण्याचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. आर्थिक समावेशन आणि कौशल्य विकास या क्षेत्रामध्येही जिल्ह्याने डिसेंबर 2020 मध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे, असेही त्यावेळी सांगितले.

d

उमरगा तालुक्यातील कडदोरा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक श्री.उमेश रघुनाथ खोसे यांना यावर्षी शिक्षक दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. श्री.उमेश खोसे यांचे पालकमंत्री श्री.गडाख यांनी वैयक्तीक आणि जिल्हावासीयांतर्फे मन:पूर्वक अभिनंदनही केले. उस्मानाबाद जिल्ह्यात यावर्षी 58 लाख 20 हजार वृक्ष लागवड करण्यात आली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा 145 टक्के अधिक झाडांची जिल्ह्यात लागवड करण्यात आली. आता जिल्ह्यात झाडे जगवण्याकडे कल वाढल्याने वृक्ष आच्छादनाचे प्रमाणही वाढण्यास मदत होणार आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्य शासनाच्या दि. 30 जुलै 2021 च्या शासन निर्णयाप्रमाणे पीक पेरणीची माहिती भ्रमणध्वनीवरील ॲपद्वारे (Mobile App) गाव नमूना नंबर 12 मध्ये नोंदविण्यात येत आहे. आपल्या जिल्ह्यातील सर्व महसूल यंत्रणा हे काम करीत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर कृषी पतपुरवठा सुलभ होईल. पीक विमा आणि पीक पाहणी दावे तात्काळ निकाली काढता येतील. तसेच पीकांचे नैसर्गीक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई देताना या माहितीचा उपयोग होईल. दि. 15 ऑगस्ट 2021 पासून जिल्ह्यातील शेतकरी खातेदार यांनी “ई-पीक पाहणी” ॲप डाऊनलोड करुन त्यामध्ये आपली माहिती अचूक भरावी, असे मी शेतकऱ्यांना आवाहन केले होते. त्यास अनुसरुन उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या कार्यक्रमास भरघोस प्रतिसाद दिला आहे, असे सांगून श्री.गडाख यांनी जिल्ह्यात दि. 16 सप्टेंबर 2021 अखेर जिल्ह्यातील 4 लाख 9 हजार 995 खातेदार शेतकऱ्यांपैकी  1 लाख 80 हजार 448 शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंदणी “ई-पीक पाहणी” ॲपवर केली आहे. ही संख्या औरंगाबाद महसूल विभागात सर्वाधिक आहे. त्यामुळे सरासरीमध्ये उस्मानाबाद जिल्हा राज्यात सर्वप्रथम आहे, अशी माहिती दिली.

कृषी विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन अभियान आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. यात सामूहिक शेततळे,फलोत्पादन यांत्रिकीकरण, नियंत्रित शेती, कांदा चाळ आणि वैयक्तीक शेततळे अस्तरिकरण यासाठी सन-2020-21 मध्ये 687 लाभार्थ्यांना 623 लाख रुपये मध्ये वितरीत केले आहेत. राष्ट्रीय सुक्ष्म सिंचन अभियानांतर्गत सन-2021-22 मध्ये 2933 लाभार्थ्यांना 1173 हेक्टरसाठी 4 कोटी 23 लक्ष  रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे, असे सांगून श्री.गडाख यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत 25 हजार 197 लाभार्थ्यांना 82 कोटी रुपयांचे अनुदान थेट त्यांच्या खात्यावर डीबीटी द्वारे जमा करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत जिल्ह्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत नवीन सिंचन विहिर योजना राबविली जात आहे. जिल्ह्यात 2020-21 मध्ये 1998 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. मार्च 2022 अखेर पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेमुळे जिल्ह्यात 800 हेक्टर हंगामी सिंचन क्षेत्र निर्माण होणार आहे, अशी माहिती दिली.

कोरोनामुळे जिल्ह्यातील दोन्ही पालक मयत झालेली दहा बालके आहेत. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या योजनेअंतर्गत या दहाही बालकांच्या संयुक्त बँक खात्यावर 5 लाख रुपयांचे तर PM केअर अंतर्गत 10 लाख रुपये जमा केले आहेत. तसेच बाल संगोपन योजनेअंतर्गत दरमहा 1100 रुपये देण्यात येत आहेत. एक पालक मयत झालेल्या जिल्ह्यातील बालकांची संख्या 231 आहे. त्यांनाही बालसंगोपन योजनेअंतर्गत दरमहा 1100 रुपये देण्यात येत आहेत. कोरोनामुळे पती मयत झालेल्या महिलांची संख्या एक हजार चौदा आहे. यापैकी 550 महिलांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित महिलांनाही सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ लवकरच देण्यात येईल, असे सांगून पालकमंत्री श्री.गडाख यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या वर्षापासून चालू असलेल्या कोरोना साथीचा सामना करताना सर्वसामान्यांचे आरोग्य उंचावण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. दि. 15 सप्टेंबर 2021 पर्यंत जिल्ह्यात 66 हजार 383 कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. त्यापैकी 96.16 टक्के म्हणजेच 63 हजार 834 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक आहे. जिल्हा प्रशासनातर्फे ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर्स, बालकासाठींचे बेड आदींची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. नागरिकांनीही अनावश्यक गर्दी टाळावी, मास्कचा वापर करावा, वारंवार हात स्वच्छ धुवावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

          कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने रुग्ण उपचारांसाठी जिल्ह्यात 1172 इतक्या खाटांची सुविधा करण्यात आली आहे. बाल रुग्णांसाठी 308 खाटांची सुविधा करण्यात आली आहे. तसेच बालरुग्णांसाठी स्वतंत्र 110 ऑक्सिजन बेडचीही सुविधा करण्यात आलेली आहे. कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी सर्व प्रकारचा औषधी साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने संभावीत रुग्ण संख्येच्या दीडपट या नियोजनानुसार कोरोना प्रोटोकॉल प्रमाणे औषध खरेदी करण्यात येत आहे, असे सांगितले.

          मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील 89 गाव तलाव व पाझर तलावांच्या विशेष दुरुस्तीसाठी रु.15 कोटी मंजुर करण्यात आले आहेत. यामुळे 10 हजार 694 T.C.M. साठवण क्षमता व 2138 हेक्टर सिंचन क्षमता पुनर्स्थापित होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी प्रथम पालकमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. पालकमंत्री श्री.गडाख यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांनी शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. उपस्थित मराठवाडा संग्राम आणि स्वातंत्र्य संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्या पत्नींची तसेच ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही पालकमंत्र्यांनी भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी अधिकारी कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

From around the web