तेरणा शेतकरी साखर कारखाना भाडेतत्वावर घेण्यास अनेकांनी पाठ फिरवली 

डीसीसी बँकेकडून फेरनिविदा प्रसिध्द 
 
s

उस्मानाबाद : कर्जाच्या ओझ्याखाली अडकलेला तेरणा शेतकरी साखर कारखाना भाडेतत्वावर घेण्यास अनेकांनी पाठ फिरवल्याने आता पुन्हा फेरनिविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. 16 सप्टेंबर रोजी जिल्हा बँकेच्या मुख्यालयातील सभागृहामध्ये ही निविदा उघडली जाणार होती मात्र दुसऱ्यांदा निविदा प्रसिध्द केल्याने ती आता चार ऑक्टोबर रोजी उघडली जाणार आहे. नव्या निविदेमध्ये काही भाव कमी केल्याने पुन्हा स्पर्धा वाढेल असे गृहित धरुन ही फेरनिविदा काढण्यात आल्याचे बँकेच्या प्रशासनाकडुन सांगण्यात आले आहे.

मराठवाड्यातील पहिला साखर कारखाना म्हणून ओळख असलेला ढोकी येथील  तेरणा शेतकरी साखर कारखाना सन  २०१२ पासून बंद आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची तेरणाकडे व्याजासह ४२५ कोटी थकबाकी आहे. कारखाना सध्या भंगारअवस्थेत असून हा सुरु करायचा  म्हटलं तर जवळपास ४० ते ५० कोटी खर्च अपेक्षित आहे. ४० ते ५० कोटींमध्ये स्वतःचा खासगी साखर कारखाना उभा राहत असेल तर तेरणा साखर कारखाना भाडेतत्वावर घेण्याचे धाडस कोण करेल ? असा सवाल व्यक्त केला जात आहे. 

डीसीसी बँकेकडून फेरनिविदा प्रसिध्द 

पहिल्यावेळी चार संस्थानी निविदा खरेदी केली होती, त्यामध्ये मेयर कमोडीटीज इंडस्ट्रीज मुंबई, 21 शुगर्स मुंबई, डीडीएन एसएफए मुंबई व धाराशिव कारखाना यांचा समावेश होता. तेरणा शेतकरी सहकारी कारखाना अवसायनात निघाला असुन पाच हजार मेट्रीक टन इतकी गाळप क्षमता व देशी दारुचे उत्पादन तसेच वीज निर्मीतीचा 14 मेगावॅटचा प्रकल्प यामध्ये अंतर्भुत आहे. यामध्ये भाडेतत्वावर देताना हा कारखाना 21 वर्ष करारावर देण्यात येणार आहे,यामध्ये पहिल्या वर्षी चार कोटी रुपये, दुसऱ्या वर्षी साडेपाच कोटी रुपये तर पुढील सर्व वर्ष प्रत्येकी साडेआठ कोटी रुपये भाडे स्विकारले जाणार आहे.

या भाडेकरारात कारखान्याची 105 हेक्टर 41 आर इतकी जमीन देखील मिळणार आहे.मालमत्ता जशी आहे आणि जिथे आहे,ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत अशा अटीवर व ज्यास कोणतीही हमी,खात्री, बंधन,जबाबदारी वा प्रतिनिधीत्वशिवाय असलेल्या तत्वावर भाड्याने देण्यात येणार आहे. निविदेतील भाडे ठरलेल्या रक्कमेपेक्षा अधिक असणे महत्वाचे असणार आहे.जिल्हा बँकेचे कारखान्यावर 127 कोटी 31 लाख इतके मुद्दल आहे,त्या कर्जावरील व्याजाची रक्कम 185 कोटी 15 लाख रुपये आहे.एकुण 312 कोटी 46 लाख रुपयाचे कर्ज कारखान्यावर आहे.यामुळे एवढ्या मोठ्या रक्कम असलेला कारखाना भाडेतत्वावर घेण्यासाठी कितीजण इच्छा व्यक्त करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

असा केला बदल -

शिवाय भाड्यापोटी प्रतिमेट्रीक टन गाळपावर 125 रुपयावरुन आता 75 केली आहे.डिस्टलरी प्रतिलिटर एक रुपये,तीसऱ्या चौथ्या वर्षी दिड रुपये पाचव्या वर्षीपासुन दोन रुपये करण्यात आली आहे.अगोदर पहिल्यावर्षीपासुन दोन रुपये होते.देशी दारुवर प्रतिलिटर तीन रुपये होते त्यामध्ये पहिल्या तीन वर्षात दोन रुपये व चौथ्या वर्षीपासुन तीन रुपये केले आहे.वीजनिर्मीती प्रकल्पाच्या उत्पादनाचे 25 टक्के एवढा मोबदला होता मात्र आता तो दहा टक्के केला आहे.


 

From around the web