मनोहर जोशी यांनी उस्मानाबादचं  नामांतर धाराशिव केलं तर विलासरावांनी ते रद्द केलं !

 
मनोहर जोशी यांनी उस्मानाबादचं  नामांतर धाराशिव केलं तर विलासरावांनी ते रद्द केलं !

उस्मानाबाद - उस्मानाबादच्या नामांतराची पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे. CMOMaharashtra या अधिकृत फेसबुक पेज आणि  ट्विटर हँडलवरून उस्मानाबादचा उल्लेख 'धाराशिव' करण्यात आला आहे.त्यानंतर पुन्हा एकदा उस्मानाबादच्या नामांतराची चर्चा सुरु झाली आहे. 

उस्मानाबादला शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर केल्यानंतर  CMOMaharashtra या अधिकृत फेसबुक पेज आणि  ट्विटर हँडलवरून  ‘धाराशिव-उस्मानाबाद येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला संलग्न 430 खाटांचे रुग्णालय निर्माण करणे,’ असं सीएमओनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उस्मानाबादच्या नामांतरास पाठींबा असल्याचे मानले जात आहे. 

त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या भूमिकेमुळे या नामांतरास बळ मिळाले आहे. नामांतराच्या विषयावरुन सुरु असलेल्या वादावर  शरद पवार यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, “आमच्यात वाद नाहीत. संभाजीनगर म्हणा, धाराशिव म्हणा, नाहीतर अजून काही म्हणा..या प्रकरणाकडे मी गांभीर्यानं बघत नाही. त्यामुळे मी कधीही भाष्य केलं नाही”. 

शरद पवार यांच्या भूमिकेने मुख्यमंत्र्यांना पाठबळच मिळाले असून विरोध करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची मात्र मोठी गोची झाली आहे.


उस्मानाबादचं  जुनं  नाव धाराशिव असंच  होतं . ग्रामदैवत असलेल्या धारासुर मर्दिनी या देवीच्या नावावरून धाराशिव असल्याचे खुप पुरावे सापडतात पण निजामशाही मधील राजा उस्मान अली खान याच्या नावावरून धाराशिव शहराचे नाव उस्मानाबाद झाल्याचेही संदर्भ आढळतात.सन १९०३ - ०४  मध्ये धाराशिवचं  नामांतर उस्मानाबाद करण्यात आलं आहे. जुने लोक आणि शिवसेना- भाजपचे कार्यकर्ते आजही उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव करतात. 

राज्यात महाविकास आघाडीचं शासन असलं तरी मुख्यमंत्री शिवसेनेचं असल्यामुळे उस्मानाबादच्या नामांतराची हवा पुन्हा सुरु झाली आहे. 

मनोहर जोशी यांनी उस्मानाबादचं  नामांतर धाराशिव केलं तर विलासरावांनी रद्द  केलं !

१९९५ मध्ये शिवसेना - भाजपचं  युती शासन सर्वप्रथम सत्तेवर आल्यानंतर तत्त्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी, उस्मानाबादच्या नामांतराला पाठींबा देवून मंत्रिमंडळ बैठकीत उस्मानाबादचे 'धाराशिव' नामांतराचा ठराव मंजूर करून घेतला होता, त्यानंतर नामांतर विरोधी लोकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून नामांतर ठरावास स्थगिती मिळविली होती. 

त्यानंतर सन  २००० मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर मनोहर जोशी यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केलेला  ठराव  (उस्मानाबादचं  नामांतर धाराशिव ) रद्द केला होता आणि औरंगाबाद खंडपीठात तसे कळवून याचिका निकाली काढली होती. आता पुन्हा नामांतर ठराव मंजूर केल्यास औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळं उस्मानाबादचं  नामांतर म्हणावं तितकं सोपं नाही. 

जाता - जाता 

कै .विलासराव देशमुख यांनी उस्मानाबादच्या नामांतराचा ठराव रद्द केला असला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्विटर हँडलवर विलासरावांचे चिरंजीव आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या फोटोसह धाराशिव झळकत आहे. विशेष म्हणजे याबद्दल अमित देशमुख यांनी कोणतेही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही. 


 

From around the web