कोविडची तिसरी लाट सक्षमपणे थोपवून परत लावण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा 

प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट सुरु करावेत
 
कोविडची तिसरी लाट सक्षमपणे थोपवून परत लावण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा
-  राज्यमंत्री संजय  बनसोडे

उस्मानाबाद - कोरोना बाधित रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांना प्राथमिक औषधोपचार मिळण्याबरोबरच अत्यावश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच तिसरी लाट थोपविण्यासाठी आरोग्य विभागासह सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे. त्याबरोबरच जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन प्लांट सुरु करावेत, अशा सूचना पर्यावरण व वातावरणीय बदल पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य, राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात दि.10 मे रोजी कोविड संदर्भात जिल्हास्तरीय आढावा बैठक राज्यमंत्री बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर आ. कैलास घाडगे-पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, जिल्हा पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी.के. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, माजी आ. राहुल मोटे, एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, डॉ. प्रतापसिंह पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, सुरेश बिराजदार, सक्षणा सलगर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, कोविडच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क करण्याबरोबरच ग्रामीण भागात देखील याबाबत अत्यावश्यक असलेला सर्व औषधोपचार उपलब्ध करून तो रुग्णांना वेळेवर मिळेल यासाठी योग्य नियोजन करावे अशा सक्त सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच सध्या उपलब्ध असलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरात आहेत का नाही याची माहिती घेऊन ते वापरत नसतील तर पूर्ण क्षमतेने त्याचा रुग्णासाठी वापर करावा. तर लहान मुलांच्या  बाबतीत टास्क फोर्स नेमून लहान मुलांसाठी कोविड केअर सेंटर तयार करण्यात यावे. त्यासाठी खासगी बालरोग तज्ञांची देखरेखीसाठी नेमणूक करण्याबरोबरच काही खासगी हॉस्पिटल देखील कोविड केअर सेंटरसाठी ताब्यात घ्यावीत. 

रुग्णांना सेवा देण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची जिल्हास्तरावर भरती करण्यात यावी. माझे कुटूंब, माझी जबाबदारी अंतर्गत जिल्ह्यातील  कोविड हॉटस्पॉट असलेल्या 156 गावांचे पुन्हा सर्वेक्षण करावे. त्यासाठी प्रत्येक घरातील व्यक्तींची कोविड संदर्भात आवश्यक असलेली ॲन्टिजेन तपासणी करावी. त्यासाठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच गृह विलगीकरणात असलेल्या काही व्यक्ती गावात फिरत असल्यामुळे कोविड विषाणूंचा प्रसार व प्रादुर्भाव वाढत आहे. हे रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला सामूहिक जबाबदारी म्हणून सहकार्य करावे असे आवाहन ना. बनसोडे यांनी केले. विशेष म्हणजे रुग्णांस प्राथमिक अवस्थेत अत्यवश्यक असणारी सर्व प्रकारची औषधे वेळेवर उपलब्ध करून द्याव्यात अशा सक्त सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. 

यावेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना विद्युत पुरवठा खंडीत होत असल्यामुळे ऑक्सिजन घेण्यास व देण्यास अडचणी येत आहेत. ही अडचण दूर करण्यासाठी प्रत्येक कोविड केअर सेंटरमध्ये इन्वर्टर व जनरेटरचा वापर करण्यात यावा. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांनी देखील आरोग्य यंत्रणेला सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तर आ. कैलास घाडगे-पाटील यांनी किट मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी केली. तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे म्हणाले की, आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असून राज्य शासनाने आवश्यक त्या प्रमाणात आरोग्य कर्मचारी भरती करण्यास परवानगी दिल्यास रुग्णांना सेवा देणे सुलभ होईल असे त्यांनी सांगितले. 

यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्हयातील कोरोना बांधित रुग्णांची संख्या,रुग्णं शोध मोहिम व त्यांच्यावर आरोग्य विभागाच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या उपाययोजना विषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी माजी आ. राहुल मोटे, जीवनराव गोरे, सुरेश बिराजदार, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी यावेळी चर्चेत भाग घेतला.दरम्यान राज्यमंत्री बनसोडे यांनी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटला भेट देऊन पाहणी  केली.
 

From around the web