श्री तुळजाभवानी देवीची महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा
तुळजापूर - शारदीय नवरात्र महोत्सवात बुधवारी दुर्गाष्टमी दिवशी तुळजापुरात श्री तुळजाभवानी देवीची महिषापूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली आहे.
श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. ज्यावेळी महिषासुराने देवतांना हाकलून दिले व स्वत: स्वर्गाचा आनंद भोगू लागला त्यावेळी साक्षात पार्वती अवतार असलेल्या श्री तुळजाभवानी माता सर्व देवांच्या तेजापासून उत्पन्न झालेली जगदंबा माता भवानी आहे. हिने सर्व दैत्यांचा राजा महिषासुरचा वध केला व सर्व देवतांना स्वर्ग प्राप्तीचा आनंद दिला. त्यामुळे देवीला महाअलंकार घालण्यात येऊन महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येते. अशी आख्यायिका सांगितली जाते.
साक्षात पार्वती असणाऱ्या तुळजाभवानी देवीने दैत्यराज असणाऱ्या महिषासुराचा वध केला आणि साधूंचे रक्षण केले, त्यामुळे महिषासुर मर्दिनी महापूजा बांधण्यात येते.
वैदिक होम व हवनास विधीवत पुर्णाहुती
शारदीय नवरात्र महोत्सवात आज बुधवारी श्री तुळजाभवानी मंदीरात वैदिक होम व हवन कार्यक्रम झाला. सप्तसतीचा पाठ करुन अष्टमीच्या दिवशी मुख्य होमावर पूर्णाहूती देण्याची प्रथा आहे. मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सपत्नीक सर्व विधीवत पूजेनंतर या होमास पूर्णाहुती देण्यात आली..
यावेळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्री . दिवेगावकर यांच्यासह पाळीकर पुजारी मंडळ, उपाध्ये मंडळ, भोपे पुजारी मंडळाचे पदाधिकारी, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) योगिता कोल्हे, तहसीलदार श्री सौदागर तांदळे, मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक सिध्देश्वर इन्तुले, आदी उपस्थित होते. याशिवाय भोपे, पुजारी, आराधी, गौंधळी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजा श्री शिवराज बहादूर धर्मवंत धर्मकर्ण दक्षिण हैद्राबाद संस्थान यांचे यमजान पद पुरंजन कोडों, कांचन कोडों यांनी तर कोल्हापूर संस्थान छत्रपती चॅरिटेबल संस्थान कोल्हापूर यांच्यातर्फे उपाध्ये यजमान पद प्रतीकचंद प्रयाग, मंदाकीनी प्रयाग यांनी भूषविले. यावेळी व्यवस्थापक आप्पासाहेब पाटील यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. हैद्राबाद आणि कोल्हापूर संस्थानच्या होम हवनास मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री . दिवेगावकर यांनी पूर्णाहुती दिली.
उद्या (दि. 14 रोजी) महानवमी निमित्त श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पुजा दुपारी 12 वाजता होमावर धार्मीक विधी, घटोत्थापन आणि रात्री नगरहून येणारे पलंग पालखीची मिरवणूक होणार आहे.