पोलीस बदली प्रकरणातील दलाल महादेव इंगळे कळंब तालुक्यातील रहिवासी

अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांनी केला खुलासा 
 
पोलीस बदली प्रकरणातील दलाल महादेव इंगळे कळंब तालुक्यातील रहिवासी

उस्मानाबाद - राज्यात पोलिसांच्या बदल्यांमध्ये किती भ्रष्ट्राचार आहे, हे उघड करणारा गोपनिय अहवाल अनेक माध्यमांनी प्रसिद्ध केला आहे. त्या अहवालातील एजंट्सची नावंही समोर आली आहेत. तत्कालीन राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगद्वारे राज्यातील पोलिसांच्या बदल्याचं रॅकेट उघडकीस आणलं होतं. यासंदर्भातील अहवाल त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिला होता. या अहवालात जवळपास अर्धा डझन एजंट्स आणि चाळीस एक अधिकाऱ्यांची नावं आहेत. पोलिसांच्या बदल्यांचं रॅकेट चालवणाऱ्या दलालांनी किती अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, यासंदर्भाती यादीच या अहवालात आहे. 

रश्मी शुक्ला यांनी तयार केलेला अहवाल राज्याच्या पोलीस महासंचालकांनी राज्याच्या मुख्य सचिवांना हा अहवाल मुख्यमंत्र्यांनाही पाठवला होता. परंतु, त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. हाच अहवाल देण्यासाठी आज देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली असून यासंदर्भात त्यांनी कारवाईची मागणी केली आहे. 

यातील एक दलाल महादेव इंगळे  याचे नाव टॉपवर आहे. तो उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील रहिवासी आहे. बदली प्रकरणात उस्मानाबादचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांचे नाव आल्याने खळबळ उडाली आहे. 

बदली प्रकरणात उस्मानाबादचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांचे नाव !


यासंदर्भात खुलासा करताना, उस्मानाबादचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पालवे म्हणाले  की ,  महादेव इंगळे  हा उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील असून, तो मंत्रालयात फिरतो. त्याने कोणत्या कारणासाठी आपणशी संपर्क केला हे आपणास आठवत नाही. आपली बदली जुलै २०१९ मध्ये उस्मानाबादला झाली आहे. म्हणजे हे सरकार येण्याअगोदर झाली आहे. तेव्हापासून आपण येथेच आहे. 

तुम्ही टीव्ही मधील बातमी पाहा , पोस्टिंग कुठे आहे आणि कुठे मागितली हे नमूद आहे.  माझ्या नावापुढे पोस्टिंग कुठे मागितली आहे, हे नमूद नाही. महादेव इंगळे  व्यक्तीशी आपण कधीही भेटलो नाही आणि त्याला आपण ओळखत नाही, असेही  पालवे म्हणाले. 

From around the web