उस्मानाबाद जिल्हयात 31 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊनचे  नियम लागू 

 
उस्मानाबाद जिल्हयात 31 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊनचे  नियम लागू

उस्मानाबाद  -   महाराष्ट्र शासनाने कोव्हिड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी दिनांक 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविला आहे व लॉकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. 

 उस्मानाबाद जिल्ह्यातील करोना विषाणु (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून लॉकडाऊनच्या वाढविलेल्या कालावधीत महाराष्ट्र शासन आदेशान्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात दिनांक 01 डिसेंबर 2020 पासून ते 31 डिसेंबर 2020 रोजीचे 24.00 वाजे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात येत आहे. 

जिल्ह्यात दिनांक 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आलेल्या लॉकडाऊनचे कालावधीत गृह विलगीकरण (Home Quarantine) च्या नियमांचे उल्लंघन करणा-या व्यक्ती विरोधात आणि गैरकृत्यांबाबत दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश संपूर्ण जिल्ह्यात पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. लॉकडाऊन च्या कालावधीत शासनाने यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश या आदेशासोबत  दि. 31 डिसेंबर 2020 पर्यंत लागू राहतील. यापूर्वी वेळोवेळी अन्य कोणत्याही विशिष्ट/सर्वसाधारण आदेशानुसार परवानगी दिलेल्या बाबी परवानगी आदेशात नमूद केलेल्या अटी व शर्तींसह चालू राहतील.

सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60, महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम 2020 चे नियम 11, साथरोग अधिनियम 1897 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनीय अथवा कायदेशीर कारवाईस पात्र राहील.

सदर आदेशाची अंमलबजावणी दिनांक 01.12.2020 पासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद कौस्तुभ दिवेगावकर यांनी कळविले आहे.

From around the web