उस्मानाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीला विधिमंडळात हिरवा कंदील
मुंबई - राज्यात उस्मानाबादसह ७ जिल्ह्यांमध्ये नव्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली. यामध्ये उस्मानाबाद, सिंधुदुर्ग,नाशिक, रायगड, सातारा, अमरावती आणि परभणी येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन केलं जाईल, असं अजित पवार म्हणाले. तसेच. यामुळे, पदवी स्तरावरील १९९० तर पदव्युत्तर स्तरावर १ हजार विद्यार्थ्यांच्या जागा वाढणार असल्याचं देखील ते म्हणाले.
उस्मानाबादला 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यास संलग्न 430 खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय १३ जानेवारी रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. या प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी एकूण रुपये 674.14 कोटी (अनावर्ती खर्च सुमारे रुपये 429.63 कोटी व आवर्ती खर्च सुमारे रूपये 244.51 कोटी) इतका निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच आवश्यक तेवढी पदनिर्मिती करण्यास आणि पदे भरण्यास देखील मान्यता देण्यात आली होती.
त्यानंतर आज विधानसभेत अर्थसंकल्प मांडताना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी उस्मानाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली, मात्र त्यासाठी आवश्यक असलेला निधीची घोषणा त्यांनी केलेली नाही. निधी केव्हा मिळणार आणि महाविद्यालय केव्हा सुरु होणार याकडं लक्ष वेधलं आहे.