उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना समुपदेशन हेल्पलाईन सेवेची सुरुवात

 
x

उस्मानाबाद - जिल्हाधिकारी कार्यालय,  टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर आणि कोहिजन फाऊंडेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने व एचडीएफसी बँक सी एस आर यांच्या अर्थसहाय्याने  कोरोना समुपदेशन हेल्पलाईनची सुरुवात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने करण्यात आली.  

उदघाटन प्रसंगी जिल्हाधिकारी म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेचा अनुभव घेवून या लाटेमध्ये अतिशय सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे, त्याच बरोबर  जिल्हयात  कोविड सेंटर, ऑक्सिजन निर्मिती  प्लांट व देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे रुग्णांना याचा मोठा फायदा होत आहे. 

ग्रामीण भागातील युवक स्थलांतरित होऊन आल्यानंतर ते मोठ्या प्रमाणात आपल्या शेतीकडे वळल्याचे दिसून येत आहे.  त्यामुळे त्या कुटुंबांना शेती शिवाय मिळणारे आर्थिक पाठबळ कमी झाल्यामुळे ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.  

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेकडे आपत्ती व्यवस्थापनातील, सामाजिक, आर्थिक, उपजिविका तसेच विविध विषयातील संशोधन क्षेत्रातील असलेला अनुभव निश्चितच उस्मानाबाद जिल्हयाच्या विकासासाठी होईल असे मत  व्यक्त केले. 

सद्य स्थितीत रुग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा सुविधा  बरोबरच मनो-सामाजिक समुपदेशनाची गरज आहे त्याचबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या सोयी, सुविधा यांची माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी व त्याची माहिती होण्यासाठी  या समुपदेशन हेल्पलाईनची गरज असल्याबाबत त्यांनी सांगितले.  त्यामुळे नागरिकांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन केले.

टाटा संस्थेच्या संचालिका शालिनी भरत म्हणाल्या की, कोरोनाचा प्रभाव लक्षात घेवून रुग्णांच्या शारीरिक आरोग्याबरोबरच त्यांचे मानसिक आरोग्य ही समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.  कोरोना समुपदेशन हेल्पलाईन ही रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना, विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना तसेच सर्वच स्थरातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी ही उपयोगाची आहे. या समुपदेशनाच्या माध्यमातून क्षमता बांधणी करून यावर मात करणे शक्य आहे  आमची संस्था भविष्यात जिल्हयातील आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक व उपजीविका या महत्वपूर्ण  विषयावर जिल्हाधिकारी कार्यालया बरोबर काम करणार असल्याचे सांगितले.

या प्रसंगी कोहीजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कपूर म्हणाले की, वेगवेगळ्या स्तरावर नागरिकांना जागरूक करण्यासाठी या हेल्पलाईनचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल व या कार्यात आमची टीम उत्तम योगदान देईल अशी ग्वाही दिली. 

एचडीएफसी परिवर्तन सी.एस.आर. प्रमुख रितेश सिन्हा यांनी या उपक्रमास सर्वोतपरी आर्थिक सहयोग देण्याचे आश्वासन दिले.  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रो. रमेश जारे, अधिष्ठाता, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापुर म्हणाले जिल्हयातील नागरिकांमध्ये कोरोनाच्या बाबतीत असलेली भिती व त्यामुळे येत असलेले नैराश्य दूर करण्यामध्ये ही हेल्पलाईन महत्वाची भूमिका निभावेल असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचा समारोप व आभार प्रदर्शन करताना गणेश चादरे म्हणाले की, ज्या ज्या वेळेस आपल्या जिल्हल्यावरती विविध संकटे आली आहेत.  त्या त्या वेळेस त्याचे निर्मुलन करण्यासाठी व नागरिकांना विविध माध्यमातून मदत करण्यासाठी टाटा संस्था जिल्हल्याप्रति असलेली सामाजिक बांधिलकी, उत्तरदायित्व व कर्तव्य म्हणून कार्य करते. सध्याच्या कोरोनाच्या संकट समयी प्रत्येकांनी आपले शारीरिक व मानसिक आरोग्य तेवढेच सकारात्मक व भयमुक्त ठेवणे आवश्यक आहे आणि अशा स्थितीत नागरिकांनी आपल्या मनातील भिती दायक समस्या मुक्त पणाने व्यक्त करण्यासाठी आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी एक स्वतंत्र अनुभवी व तज्ञ समुपदेशक समुपदेशन सेवा देण्यासाठी नियुक्त केले असल्याचे सांगितले. 


तालुका निहाय समुपदेशक व हेल्पलाईन नंबर

 उस्मानाबाद - 
 सोनाली गुजराथी 
7498701779

 तुळजापूर - 
 मनोहर दावणे 
8788534770

 उमरगा - 
 किरण कदम 
9373827115

 लोहारा - 
श्रीम. शुभांगी कुलकर्णी 
8080234324

 परंडा - 
आनंद भालेराव 
7666269617

 भूम - 
शंकर ठाकरे 
7666284303

 कळंब - 
 गणेश चादरे
7666290636

 वाशी - 
सोनाली गुजराथी 
7498701779

From around the web