जागतिक आरोग्य दिनानिमित्त “सुंदर माझा दवाखाना” व “मिशन आनंदी” मोहिमेचा प्रारंभ
धाराशिव :- दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्यदिन म्हणून साजरा केला जातो. सार्वजनिक आरोग्य विभागाने यानिमित्त यावर्षी राज्यातील सर्व सरकारी आरोग्य केंद्रामध्ये स्वच्छता मोहिम राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. प्रा. तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून जनमाणसात आरोग्यसेवा अधिक सुंदर व स्वच्छ लोकाभिमुख करण्यासाठी 7 ते 14 एप्रिल दरम्यान “सुंदर माझा दवाखाना" हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितिन बोडके यांनी दिली.
(Health Equity, Health for all) सर्वांसाठी समान आरोग्य सुविधा, सर्वांसाठी आरोग्य या घोषवाक्याच्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या रुग्णालयात, आरोग्य संस्थेत सर्वांना समान सुविधा उपलब्ध आहेत आणि जास्तीत जास्त लोकांनी सार्वजनिक रुग्णालयाच्या सुविधांचा वापर केला पाहिजे. याबाबत जनसामान्यात जनजागृती निर्माण करायची आहे. या दृष्टीने “सुंदर माझा दवाखाना" ही संकल्पना राबविण्याची संकल्पना सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी दिली आहे. यामध्ये आपण दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी स्वच्छता दिवस राबवित आहोत. हा स्वच्छता दिवस आपणास नियमित राबवायचा आहे.
आपला परिसर स्वच्छ ठेवल्यास आपण रोगराई टाळू शकतो. तसेच Hospital Aquired Infection म्हणजेच रुग्णालयातील संसर्ग टाळून रुग्णालयातील कर्मचारी वृंद व येणाऱ्या गर्भवती माता व बालके यांचे आरोग्य अबाधित ठेवता येईल. म्हणून “सुंदर माझा दवाखाना" ही संकल्पना आपण कायमस्वरुपी चालू क्रियाकलाप (On Going Activity) स्वरुपात चालू ठेवायची आहे.
दि. 07 ते 13 एप्रिल 2023 या कालावधीत "मिशन आनंदी” अंतर्गत सर्व 30 वर्ष आणि त्यावरील महिलांची असांसर्गिक आजार म्हणजेच (Noncomunicable Disease) यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, स्तनांचा, विषेशतः गर्भाशय तोंडाचा कर्करोग याची VIA तपासणी करण्यात येणार असून त्यामुळे कर्करोगाचे लवकर निदान व लवकरात लवकर उपचार यास फायदा होणार आहे.
एकूण 30 वर्षावरील लोकसंख्या 10 लाख 67 हजार 487 असून त्यापैकी 6 लाख 13 हजार 625 इतक्या लोकसंख्येची नोंदणी झाली आहे आणि 2 लाख 63 हजार 292 इतक्या लोकांची पूर्ण तपासणी झाली आहे. तर उरलेल्या लोकसंख्येची तपासणी नजीकच्या काळात होणार आहे. तसेच गर्भाशयाच्या तोंडाच्या कर्करोगाचे उद्दिष्ट 3 लाख 466 असून त्यापैकी 24 हजार 204 तपासणी झाली आहे. उर्वरित नजिकच्या काळात पूर्ण करावयाची आहे.
यानिमित्ताने 7 एप्रिल 2023 रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त “मिशन आनंदी” मोहिमेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. जिल्हयातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी या मोहिमेचा प्रारंभ सर्वत्र होणार आहे. त्याअनुषंगाने सर्व तालुक्यांचे VIA प्रशिक्षण दि. 5 व 6 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आले. या असंसर्गजन्य आजारांचा विळखा सध्या आपल्या समाजाला जास्त प्रमाणात आढळून येत आहे. या आजारांचे निदान करण्यासाठी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विविध तपासण्या केल्या जातात. तसेच यावर समुपदेशन पण केले जाते. याचा वेळोवेळी नागरिकांनी लाभ घ्यावा व आरोग्याची काळजी घ्यावी, महिलांनी स्वतःची तपासणी करावी. त्यामुळे संभाव्य व्याधी टाळता येतील, असे जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी डॉ.नितीन बोडके यांनी कळविले आहे.