खत दरवाढीवरून सत्ताधारी आणि विरोधकांत 'कलगीतुरा' सुरु... 

आंदोलन करणाऱ्यांच्या नेत्यांनी कृतीतून खरा कळवळा दाखवावा...
 
rana
- आ. राणाजगजितसिंह पाटील

उस्मानाबाद - केंद्राने वाढीव दराच्या खतापोटी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, तसेच आंदोलन करणाऱ्यांच्या नेत्यांनी कृतीतून खरा कळवळा दाखवावा, असे भाजप आमदार आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. 


रासायनिक खताचे दर गेल्या काही दिवसात ५० टक्के पेक्षा अधिक वाढले आहेत. पेट्रोल व डिझेलचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सगळ्यांना कल्पना आहे कि, देशातील खते व इंधनाचे दर हे आयात केलेल्या कच्च्या मालाच्या दरावर अवलंबून असतात आणि जागतिक स्तरावर याच्या दराचा भडका उडाल्यामुळे ही दरवाढ अनुषंगिक आहे.

कोरोनाच्या या भयावह  परीस्थितीत सर्वांचे अर्थकारण कोलमडले आहे, यांत वाढते इंधन दर हे सर्वांना अन्यायकारक वाटतात. खताच्या बाबतीत ऐन खरिपाच्या तोंडावर झालेली दरवाढ आपल्या सर्वांनाच अमान्य आहे. दि. १५/०५/२०२१ रोजी या विषयाबाबत विरोधी पक्षनेते  देवेंद्र- फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या बरोबर सविस्तर चर्चा केली होती. शेतकऱ्यांबाबत नेहमीच संवेदनशील असलेल्या केंद्र सरकारने याबाबत तातडीने योग्य पद्धतीने मदत करावी अशी मागणी प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने केंद्रीय खते व रसायन मंत्री डी. वी. सदानंद गौडा यांच्या कडे करण्यात आली आहे व नजीकच्या काळात खताच्या वाढलेल्या किंमतीचा विचार करून खत खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा केले जाईल अशी अपेक्षा आहे. 

केंद्र सरकारने दरवाढीला परवानगी दिलेली नाही, हे स्पष्ट केल्यामुळे एकतर दरवाढ अमान्य होईल किंवा अनुदान दिले जाईल. शेतकऱ्यांनी खताची खरेदी करत असताना छापील एमआरपी ची खातरजमा करून पैसे द्यावे व रीतसर पावती आवर्जून घ्यावी. e-POS प्रणालीमुळे शेतकऱ्याची पुर्ण माहीती संकलित केली जाते व उद्या अनुदान प्रदान करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

राजकीय हेतूने प्रेरित होवून काही जणांनी खत व इंधन दरवाढी बाबत आंदोलन केले आहे. पेट्रोल व डिझेलच्या विक्रीतून हजारो कोटीची रक्कम मिळणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने एक पैशाने देखील आपल्या कराचा हिस्सा कमी केलेला नाही आणि खताच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर एक पैशाचे अनुदान दिलेले नाही. त्यामुळे सत्ताधारी आंदोलन कर्त्यांना विनम्र आवाहन आहे की आधी आपल्या नेत्यांकडून इंधनावरील कर कमीकरण्या बाबत व खताला अनुदान देण्याबाबत काही ठोस निर्णय करून घ्या, खरा कळवळा कृतीतून दाखवा, असे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. 
 

From around the web