कळंब शहर पाणी पुरवठ्याच्या योजनेचे काम मार्गी लावणार
उस्मानाबाद - कळंब शहरासाठी 56 कोटी रुपये खर्च करुन कायम स्वरुपी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या शहरात जिवसृष्टीही साकार करण्यासाठी प्रयत्न केले जातील आणि या शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन, रोजगार हमी आणि संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आज कळंब येथे दिले.
कळंब नगरपरिषदेच्यावतीने बांधण्यात येणाऱ्या मल्टीपर्पज हॉल (नाट्यगृह,मंगल कार्यालय) चे तेथील मेन रोड वर भूमीपूजन आणि विविध विकासकामांचा शुभारंभ राज्यमंत्री श्री.बनसोडे यांच्या हस्ते आज करण्यात आला,त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार सर्वश्री विक्रम काळे, कैलास पाटील, नगराध्यक्षा सौ.सुर्वणा सागर मुंडे,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष जीवनराव गोरे,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, उदगीरचे नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, कळंबचे प्रभारी नगराध्यक्ष संजय मुंदडा, न.प.च्या मुख्याधिकारी श्रीमती शैला डाके,नगर अभियंता श्रीमती पार्वती कदम आदी उपस्थित होते.
कळंब शहरातील विकास कामांना प्राधान्य देण्यात येईल.मराठवाडयातील पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाच्या असलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीडचे काम टप्या टप्याने पूर्ण करण्यात येईल,असे सांगून राज्यमंत्री श्री.बनसोडे म्हणाले की, कळंब शहराला जोडणाऱ्या रस्त्यांचे काम पूर्ण होत आहे.त्यामुळे या शहराच्या दळणवळणाला गती मिळणार आहे.या रस्त्यांच्या कामामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाची उंची वाढविण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.तोही प्रश्न सोडविण्यात येईल.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे विकास कामांबाबतीत अतिशय सकारात्मक असलेले नेते आहेत.त्यामुळे या शहराच्या विकास कामांना गती देऊ,असेही ते म्हणाले.
शहरातील ज्येष्ठ नागरिाकांसाठीच्या विरंगुळा गृहाचेही श्री .बनसोडे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.दरम्यान राज्यमंत्री श्री.बनसोडे यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयांस अभिवादन केले.