राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 81 शेतकऱ्यांना सिंचन विहिरी मंजूर

 
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 81 शेतकऱ्यांना सिंचन विहिरी मंजूर

 उस्मानाबाद - राष्ट्रीय कृषी विकास योजना 2020-21 अंतर्गत अनुसुचित जाती व जमाती प्रवर्गाच्या शेतक-यांना नवीन सिंचन विहीरीचा लाभ देण्यासाठी महाडीबीटी ऑन पोर्टलवरुन प्राप्त झाले आहे. लॉटरी पध्दतीने निवड झालेल्या 81 शेतक-यांच्या यादीस जिल्हास्तरीय निवड समितीने मान्यता दिली आहे. दि. 4 मार्च-2021 रोजी जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हास्तरीय निवड समितीचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली.

         या बैठकीमध्ये तालुका निहाय लक्षांकानुसार प्राप्त झालेल्या महाडीबीटी पोर्टलवरील निवड यादीस सर्वानुमते मान्यता देण्यात आली. या योजनेच्या मार्गदर्शक सूचनामधील अटी व शर्ती पूर्ण करणा-या लाभार्थीनांच योजनेअंतर्गत नवीन सिंचन विहिरीचा लाभ देण्यात येईल. या योजनेत नवीन सिंचन विहिर याबाबीसाठी दोन लाख पन्नास हजार रुपये या उच्चतम मर्यादेत अनुदान देण्यात येते.

       या बैठकीस जिल्हा जलसंधारण अधिकारी व्ही.व्ही. जोशी, सर्वेक्षक भूजल यंत्रणेचे श्री. काळे, तंत्र अधिकारी श्री.मंगरुळे, अदिवासी प्रकल्प  कार्यालयाचे प्रतिनिधी  श्री. दिवाने, कृषी विकास अधिकारी डॉ.टी.जी चिमनशेटे, जिल्हा कृषी अधिकारी (विघयो) श्री.पी.जी. राठोड आणि पंचायत समिती कृषी अधिकारी (विघयो) आदी उपस्थित होते.    

      लाभार्थी निवड यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.राष्ट्रीय कृषी  विकास योजना 2020-21 तालुका निहाय लक्षांक,तालुक्याचे नांव,लक्षांक पुढीलप्रमाणे आहेत.

      उस्मानाबाद- 12, तुळजापूर- 15,उमरगा 10, लोहारा -09, कळंब -13, वाशी - 05, भूम- 08, परंडा- 09 एकूण-81 या योजनेअंतर्गत निवड झालेल्या आणि योजनेच्या मार्गदर्शक सुचनांमधील अटी व शर्ती पूर्ण करणा-या लाभार्थीनी नवीन सिंचन विहीरींची कामे तात्काळ सुरु करावीत, असे आवाहन कृषी आणि पशुसंवर्धन समितीचे सभापती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे,कृषी विकास अधिकारी डॉ.टी.जी.चिमनशेटे यांनी केले आहे.

From around the web