उस्मानाबादेत संयुक्त किसान कामगार मोर्चाची तीव्र निदर्शने

  दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठींबा 
 
s

उस्मानाबाद -  केंद्रातील भाजपा सरकारने केलेले शेती विषयक तिन्ही कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधी आहेत. त्यामुळे ते रद्द करावेत या मागणीसाठी गेल्या १० महिन्यांपासून हजारो शेतकरी दिल्ली बॉर्डरवरती आंदोलन करीत आहेत. मात्र झोपेचे सोंग घेतलेले केंद्र सरकार काळे कायदे रद्द करताना दिसत नाही. तसेच कोरोना महामरीच्या नावाखाली अनेक कामगारांना देशोधडीला लावण्यात केंद्र सरकार यशस्वी झाले आहे. कामगार आणि शेतकरी हे केंद्र सरकारचे दुश्मन असल्यासारखे यांच्या विरोधात केंद्र सरकार नेहमीच दंड थोपटून आहे. परंतू मागे हटेल तो शेतकरी कसला. शेतकऱ्यांनी देखील गेल्या १० महिन्यांपासून दिल्लीचे रस्ते रोखले आहेत. केंद्राने शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत यासह इतर मागण्यासाठी भारत बंद आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी उस्मानाबाद येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.

केंद्रातील भाजपा सरकारने केलेले शेतीमाल विक्री कायदा २०२०, कंत्राटी शेती कायदा २०२०, अत्यावश्यक वस्तू कायदा २०२० हे तीन्ही कायदे हे शेतकरी विरोधी आहेत हे रद्द करण्यासाठी गेल्या १० महिन्यांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन स्वातंत्र्या नंतरचे सर्वात मोठे आंदोलन आहे. तरी देखील केंद्र सरकार मागे हटण्यास तयार नाही म्हणूनच दि.२७ सप्टेंबर रोजी भारत बंदचे देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. 

तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून नदीला आलेल्या पुरामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेले आहे किंवा पिकांची मोठी हानी झालेली आहे. त्यामुळे अतिवृष्टी किंवा पुरामुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई म्हणून सांगली व सातारा जिल्ह्याप्रमाणे हेक्टरी ४० हजार रुपयांची मदत देण्यात यावी, शेती मालाला आधारभूत किंमत देण्यात यावी, परदेशी शेत मालाची आयात बंद करण्यात यावी, अतिवृष्टी बाधित व पूरग्रस्त मंडळातील पीक कापणी प्रयोग रद्द करण्यात यावेत, संकटग्रस्त शेतकऱ्यांना १०० टक्के पीक विमा भरपाई नाकारणाऱ्या विमा कंपनी विरुद्ध कारवाई करण्यात येऊन शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी व सार्वजनिक उद्योगांची कवडीमोल विक्री बंद करण्यात यावी यांसह इतर मागण्यासाठी हे आंदोलन जिल्ह्यातील पुरोगामी पक्ष व संघटनांनी मिळून संयुक्त किसान मोर्चाच्या बॅनर खाली केले.

 यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे भाई धनंजय पाटील, अमोल दीक्षित, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. प्रतापसिंह पाटील, नितील बागल, संजय पाटील दुधगावकर, सचिन तावडे, प्रशांत पाटील, ऍड योगेश सोन्नेपाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड पंकज चव्हाण, कॉम्रेड सुजित चंदनशिव, अशोक माने, बाळासाहेब गिरी, सुभाष सुतार, काँग्रेसचे ऍड. अग्निवेश शिंदे, उमेश निंबाळकर, प्रशांत पाटील, शेकापचे अनिकेत देशमुख, अतुल देशमुख, संभाजी गायकवाड, माळी महासंघाचे महादेव माळी आदींची उपस्थिती होती.

From around the web