तामलवाडी व येरमाळा येथे दुध भेसळ प्रतिबंधक अंतर्गत केंद्राची तपासणी

 नमुने तपासणीसाठी पाठविले प्रयोगशाळेत
 
s

धाराशिव  -   राज्यात दुधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त दर मिळत नाही. दुध भेसळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.जनतेला स्वच्छ व गुणवत्तापूर्ण दुधाचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने दुध व दुग्धजन्य पदार्थात होणारी भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत केली आहे.पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी भेसळ तपासणीची धडक मोहिम राबवून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्ह्यातील दुध भेसळ रोखण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यांत आली आहे.  अप्पर जिल्हाधिकारी तथा  जिल्हास्तरीय दुध भेसळ समितीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी जिल्ह्यात दुध भेसळ रोखण्याकरीता पोलीस प्रशासन,जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, अन्न व औषध प्रशासन, वैधमापनशास्त्र तसेच जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांनी समन्वय साधून संयुक्तीक कारवाई करण्यात येत आहे.

4 सप्टेंबर रोजी दुध भेसळ रोखण्यासाठी समितीने तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील गवळण मिल्क ॲण्ड मिल्क प्रोडक्टस (गट नंबर 256) या प्रकल्पास दुध भेसळ धडक मोहिमेअंतर्गत स्वयंचलित उपकरणाद्वारे दुधाची तपासणी करुन प्रकल्पातील तपासणीसाठी पनीर, क्रिम,गाय व म्हैस दुध यांचा प्रत्येकी एक नमुना असे एकूण 3 नमुने तसेच 5 सप्टेंबर रोजी कळंब तालुक्यातील येरमाळा येथील सुमित खवा सेंटरच्या खव्याचे 2 नमुने व स्वामी समर्थ सेंटर येथील खव्याचे व रबडीचा प्रत्येकी एक नमुना घेतला आहे.हे नमुने सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन यांच्यामार्फत तपासणीसाठी व विश्‍लेषणासाठी, प्रयोगशाळेत सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन यांच्यामार्फत  पाठविण्यात आले आहेत. 

 जिल्ह्यात दुध भेसळ प्रतिबंधक समितीमार्फत दुध व दुग्धजन्य पदार्थ  विक्रेते,खाजगी व सहकारी दुध प्रक्रिया प्रकल्पधारक, सहकारी व खाजगी दुध संकलन केंद्र व संस्था आदी ‍ठिकाणी दुध भेसळ तपासणीची मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व दुध विक्रेते,दुध संकलन केंद्र,खाजगी व सहकारी दुध उत्पादक संस्था व दुध प्रक्रिया यांनी उच्च गुणप्रतीचे भेसळविरहीत दुध स्वीकृत व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसह ‍विक्री करण्याबाबत तसेच त्याकरीता  वापरात येणारे वजनकाटे व दुध गुणप्रत तपासणी सयंत्रे नियमित प्रमाणीत करुन अद्यावत ठेवावे. त्याचप्रमाणे दुग्धजन्य पदार्थ व पशुखाद्य आदीबाबत उत्पादन दिनांक व मुदतपूर्व वापराबाबत माहिती छापण्याविषयी सर्व विक्रेत्यांना  जिल्हास्तरीय समितीने आवाहन केले आहे. दुध भेसळबाबत FSSAI टोल फ्री नं.1800 22 2365 हा उपलब्ध करुन दिला आहे.टोल फ्री नंबरवर दुध भेसळबाबत नागरिकांनी संपर्क साधावा,असे आवाहन श्री.शिंदे यांनी केले आहे.  

From around the web