उस्मानाबादेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हयाची विविध क्षेत्रात चांगली प्रगती व्हावी म्हणून राज्य शासन प्रयत्न करीत आहेच त्याचबरोबर जिल्हयाची आकांक्षित जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसून टाकण्यासाठी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण सर्व कटीबध्द होऊ या, असा विश्वास राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी आज येथे व्यक्त केला.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य शासकीय ध्वजारोहन त्यांच्या हस्ते झाल्यानंतर त्यांनी जनतेला उद्देशून दिलेल्या संदेशाच्या भाषणात हा विश्वास व्यक्त केला. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आ.कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,जिल्हा पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन, अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, विविध शासकीय विभागाचे प्रमुख, स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.गडाख यांच्या हस्ते प्रथम ध्वजारोहन झाले. त्यांनतर स्वातंत्र्य सैनिक स्मृती स्तंभास पुष्पचक्र त्यांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आले. त्यांनतर त्यांनी जनतेला उद्देशून भाषण केले. यावेळी विविध कोरोना योध्दा आणि इतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सन्मान पत्र पालकमंत्री गडाख यांच्या हस्ते देण्यात आले.
स्वतंत्र भारतातील लोकशाही व्यवस्थेची पायाभरणी ज्या अनेक थोर नेत्यांनी मजबूत केली, त्यांच्यासह इतर अनेक नेत्यांनी स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी स्वातंत्र्याच्या समरात प्राणांची आहुती दिली. त्या सर्व महान नेत्यांना आणि स्वातंत्र्य सैनिकांना या प्रसंगी विनम्रपूर्वक अभिवादन करुन त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करुन पालकमंत्री गडाख यांनी स्वातंत्र्य प्राप्ती नंतर आपल्या देशाने आणि राज्याने सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि उद्योग आदी विविध क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती साधली आहे.
राज्यातील सर्व सामान्य नागरिकांसह सर्व समाजांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्याच दृष्टीने आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याचीही विविध क्षेत्रात चांगली प्रगती व्हावी म्हणून राज्य शासन प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
कोरोना संक्रमणामुळे मयत झालेल्या कुटुंबातील व्यक्तींना विशेष सहाय्य योजनेचा लाभ देण्यात आला आहे.याबाबत जिल्हा महिला आणि बालविकास विभागाकडील एकूण 1 हजार 14 पिडीत व्यक्तींच्या याद्या सर्व तहसीलदार यांच्याकडे देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्राप्त अर्जांची छाननी करुन आत्तापर्यंत एकूण 521 व्यक्तींना विशेष सहाय्य योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच, उर्वरीत पात्र व्यक्तींना लाभ देण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती देऊन श्री.गडाख यांनी शेतरस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी जिल्ह्यातील लोकचळवळीने गती घेतली आहे. कृषी विकासात शेतरस्त्यांची भूमिका खूप महत्वाची असते. शेतरस्त्यांची निकड लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने 278 शेतरस्ते अतिक्रमण मुक्त केले आहेत. त्यांचा, 10 हजार 864 शेतकऱ्यांना लाभ होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 207 किमी लांबीचे रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आले आहेत,असेही ते म्हणाले.
राज्य शासनाच्या दि. 30 जुलै 2021 च्या शासन निर्णयाप्रमाणे पीक पेरणीची माहिती भ्रमणध्वनीवरील ॲपद्वारा (Mobile App) गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदविण्यासाठी स्वत: शेतकऱ्यांनी उपलब्ध करुन देण्याचा “ ई-पीक पाहणी ” कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. आपल्याही जिल्ह्यात याबाबतचे काम सर्व महसूल अधिकारी आणि प्राधिकारी यांनी सुरु केले आहे,असे सांगून पालकमंत्री श्री.गडाख यांनी हे काम पूर्ण झाल्यानंतर कृषी पतपुरवठा सुलभ होईल. त्याचबरोबर पीक विमा आणि पीक पाहणी दावे तात्काळ निकाली काढता येतील. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत होईल. त्यामुळे 15 ऑगस्ट 2021 पासून जिल्ह्यातील शेतकरी खातेदार यांनी “ ई-पीक पाहणी ” ॲप डाऊनलोड करुन त्यामध्ये आपली माहिती अचूक भरावी, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना यानिमित्त केले.
कोरोना प्रतिबंधाच्या प्रत्यक्ष तयारी सोबत आरोग्य विभागामार्फत गरोदर माता, लहान बालकांच्या लसीकरणासाठी वेगवेगळ्या मोहिमा प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ टप्पा-तीन राबवून 16 लाख 88 हजार 503 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यातून जास्तीत जास्त कोविडचे रुग्ण शोधून काढणे आणि दुर्धर आजाराच्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करणारा उस्मानाबाद हा महाराष्ट्रातला अग्रेसर जिल्हा ठरला आहे, असे सांगून श्री.गडाख यांनी सध्या कोविड लसीकरणामध्ये गावातील लाभार्थी वंचित राहू नये यासाठी गाव, वाड्या, वस्त्या पातळीवर जाऊन लसीकरण करण्याचे प्रशासनाचे काम उल्लेखनीय असेच म्हणावे लागेल. आतापर्यंत 12 लाख 59 हजार 257 पैकी तीन लाख 56 हजार 766 (28.33 टक्के) लोकांचे जिल्ह्यात लसीकरण करण्यात आले आहे. त्यात 60 वर्षावरील नागरिकांचे 70 टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. दुर्धर आजारी नागरिकांपैकी 77 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. या पुढेही कोविडमध्ये तपासणी, लसीकरण आणि जाणिवजागृतीवर विशेष भर देऊन जिल्हा कोविड मुक्त केला जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
जिल्हयात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत गेली तसे नव्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत 403 ऑक्सिजन बेडची सुविधा करण्यात आली. ते सर्व बेड सेंट्रल ऑक्सिजन बेडमध्ये रुपांतरीत करण्यात आले आहेत. 114 व्हेंटीलेटर उपलब्ध करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर आणि उमरगा येथे प्रत्येकी 50 बेडला सेट्रल ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात 10 KL इतक्या क्षमतेचा लिक्वीड ऑक्सिजन टँक उभारण्यात आला. तो एप्रिल 2021 मध्ये सुरु करण्यात आला आहे, असे सांगून त्यांनी जिल्हयात वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेवून 10 डीसीएस,12 डीसीएचसी आणि 54 सीसीसी इतके कोविड सेंटर स्थापन करुन रुग्णांना सेवा देण्यात आली आहे.या सर्व कोविड सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत असल्याने तात्पुरत्या स्वरुपात तीन माहिन्यांसाठी डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आदी मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आल्याचेही सांगितले.
सध्या जिल्हयात सेंट्रल ऑक्सिजन लाईन कार्यान्वीत करण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात 403 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पूर्ण क्षमतेने कार्यान्वीत करण्यात आले आहेत. जिल्हयात एकूण 10.65 मेट्रीक टन इतकी ऑक्सिजनची निर्मिती होत आहे.सध्या, मध्यम स्वरुपाच्या रुग्णांसाठी स्वतंत्र ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कक्ष सुरु करण्यात आला असल्याचेही पालकमंत्री गडाख यांनी सांगून याद्वारे किमान 90 ऑक्सीजन लेवल असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ठेवण्यात येत आहे.यामुळे, जिल्हयात एकही कोरोना रुग्ण ऑक्सिजन अभावी दगावला नाही, असेही स्पष्ट केले.
संभाव्य तिस-या लाटेच्या अनुषंगाने जिल्हयात PSA PIant उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच तुळजापूर,परंडा,कळंब आणि अतीदुर्गम भाग म्हणून भूम ग्रामीण रुग्णालयात बसविण्यात येत आहे. अतिरिक्त ऑक्सिजनसाठी चोराखळी आणि रांजनी येथील साखर कारखान्यातून ऑक्सिजन घेण्याची कार्यवाही चालू आहे, असे सांगून श्री.गडाख यांनी कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेच्या अनुषंगाने रुग्ण उपचारासाठी जिल्हयात 1172 इतक्या खाटांची सुविधा निर्माण करण्यात आली आहे.बाल रुग्णांसाठी 308 खाटांची सुविधा करण्यात आली आहे.यापैकी कोरोना बालरुग्णांसाठी 265 खाटांची सर्व सोई युक्त सुविधा करण्यात आलेली आहे.तसेच बालरुग्णांसाठी स्वतंत्र 110 ऑक्सिजन बेडचीही सुविधा करण्यात आलेली आहे, अशी माहिती दिली.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2020-21 करिता जिल्ह्यास 260 कोटी रुपये मंजूर निधीपैकी 259 कोटी रूपये इतका खर्च करण्यात आलेले आहे. खर्चाची टक्केवारी 99 टक्के इतकी आहे. जिल्हा स्तरावर नियोजन केले जात असले तरी तालुका निहाय समप्रमाणात कामांचे वाटप करण्यास प्राधान्य देण्यात आल्याचे सांगून आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्राप्त निधीतून 67 कोल्हापुरी बंधारे आणि 109 लघू पाटबंधारे योजनांच्या दुरुस्तीच्या कामांना प्राधान्याने मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हा, महिला, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांना 9 डिजीटल एक्स रे मशीन, 3 मॉड्युलर ऑपरेशन थिअटर, 7 ॲनास्थेशिया वर्क स्टेशन, आर.टी.पी.आर. (RT-PCR) चाचणी क्षमता वाढ व 27 प्राथमिक आरोग्य केंद्रास सेंट्रल ऑक्सीजन लाईन आदी कामे करण्यात आल्याचे सांगितले.
नीति आयोगाने विकसित केलेल्या डॅशबोर्डच्या आधारे कृषी आणि पाणीस्त्रोत या क्षेत्रात जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरीद्वारे नोव्हेंबर 2020 मध्ये चौथा क्रमांक तर डिसेंबर 2020 मध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. याबद्दल नीति आयोगाकडून 3 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. तसेच, आर्थिक समावेशन आणि कौशल्य विकास या क्षेत्रामध्येही जिल्ह्याने डिसेंबर 2020 मध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे, असे सांगून त्यांनी जिल्हयातील सर्व शैक्षणिक संस्थामधील विद्यार्थ्यांच्यामार्फत ‘एक विद्यार्थी एक झाड’ या उपक्रमात जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
कोरोना योध्यांचा सत्कार : पालकमंत्री श्री.गडाख यांच्या हस्ते कोरोना महामारी वर्ष 2021-22 मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबाबत ‘कोरोना योध्दा’ म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील रो.ह.यो.चे उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, तहसीलदार गणेश माळी, नायब तहसीलदार तुषार बोरकर, वाहन चालक राघवेंद्र जमादार तसेच महसूल विभागातील उत्कृष्ट कामगिरी केलेले अधिकारी नायब तहसीलदार पंकज मंदाडे, अव्वल कारकून नितीन देविदास चौधरी, कळंब तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी अनिल चांगदेव अहिरे, महसूल सहाय्यक हर्षनंद कांबळे, तुळजापूर तहसील कार्यालयातील तलाठी ए.जी.भातभागे, भूम तहसील कार्यालयातील वाहन चालक चंद्रकांत साळुंके, वाशी तहसील कार्यालयातील कोतवाल एम.सी.राऊत, लोहारा तहसील कार्यालयातील शिपाई अशोक क्षीरसागर, परंडा तहसील कार्यालयातील पोलिस पाटील संजय कदम आदी.
जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के.पाटील, ग्रामीण रुग्णालय नळदुर्ग येथील कोविड नोडल ऑफिसर तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. इस्माईल मुल्ला, वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन देशमुख, निवासी बाह्य संपर्क अधिकारी डॉ.सचिन बोडके, भूल तज्ज्ञ डॉ.सतिश आदटराव, ए.डी.एम.ओ. डॉ.स्नेहल तांबारे, जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे तसेच महावितरण विभागातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्रीमती निलांबरी कुलकर्णी तसेच पोलिस अधीक्षक कार्यालयातील उपविभागी पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड, सहाय्यक पोलिस निरीक्षक,दहशतवादी विरोधी पथकचे संदीप मोदे, भूम पोसिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे, जिल्हा विशेष शाखा उस्मानाबादचे पोलिस नाईक दीपक जाधव, उस्मानाबाद शहर पोलिस ठाणेचे पोलिस कॉन्स्टेबल सच्चिदानंद स्वामी, उस्मानाबाद शहर पोलिस ठाणेचे पोलिस नाईक सायलू बिरमवार.
उस्मानाबाद जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मधील राज्य पुरस्कृत विविध आवास योजना (ग्रामीण) जिल्हास्तरीय उत्कृष्ट तालुका प्रथम पुरस्कार लोहारा पंचायत समितीचे सभापती/गटविकास अधिकारी, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) जिल्हास्तरीय उत्कृष्ट तालुका प्रथम पुरस्कार वाशी पंचायत समितीचे सभापती/गटविकास अधिकारी आदींना पुरस्कार देण्यात आले. त्यांनतर पालकमंत्र्यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, नागरिक आणि अधिकारी –कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.