कोविडचा प्रसार रोखण्यासाठी आरटीपीसीआरच्या तपासण्या  वाढवा -  आरोग्य मंत्री राजेश टोपे

 
कोविडचा प्रसार रोखण्यासाठी आरटीपीसीआरच्या तपासण्या  वाढवा -  आरोग्य मंत्री राजेश टोपे

उस्मानाबाद -  कोरोना कालावधीत उस्मानाबाद जिल्हयातील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगले काम केलेले आहे. यापुढे देखील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरटीपीसीआर तपासण्या मोठ्याप्रमाणात वाढवाव्यात . या कामात  जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे व जिल्हा शल्यचिकित्सकांनी  त्या तपासण्या प्रचंड मोठया प्रमाणात कराव्यात असे आदेश  राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे  आढावा बैठकीत  केले.

    जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आरोगय मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हयातील  आरोग्य यंत्रणाची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच. व्ही वडगावे, जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ.डी.के.पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी मोतीचंद राठोड आदी उपस्थित होते.

     आरोग्य मंत्री श्री .  टोपे म्हणाले की, जिल्हयात कोरोनाच्या कालावधीत ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात घेण्यात आले होते. त्यांना यापुढील भरतीमध्ये प्राधान्याने सामावून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच जिल्हयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या जागा रिक्त असून त्या भरण्यासाठी जिल्हास्तरावरुन परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे पाठवून दयवेत . त्यास मी वरिष्ठ  पातळीवरून आवश्यकती सर्व प्रकारची मान्यता मिळवून देतो  .   उस्मानाबाद येथे नुकत्याच  मंजूर केलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी  सर्व प्रकारची मदत केली जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले . 


विशेष म्हणजे जिल्हयातील आरोग्य यंत्रणासाठी असलेल्या उपाययोजना आणि नुकत्याच मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी उपलब्ध असलेल्या सोयी सुविधेबाबत जिल्हाधिकारी दिवेगावकर, आरोग्य उपसंचालक डॉ. माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांनी मंत्री श्री . टोपे यांना  सविस्तर माहिती दिली. दरम्यान , उस्मानाबाद जिल्हयाची बऱ्याच दिवसापासून असलेली मागणी पूर्ण करून  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी दिल्याबददल जिल्हावासियांच्यावतीने खासदार राजेनिंबाळकर, आमदार पाटील, नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांच्या हस्ते टोपे यांचा सत्कार करण्यात आला.  

यावेळी  जिल्हा क्षयरोग व कुष्ठ रोग सहाय्यक संचालक, डॉ रफिक अन्सारी, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. मधुकर पांचाळ, युनिसेफ जिल्हा सल्लागार डॉ.राजेश कुकडे, राष्ट्रीय आरोग्य अभियानचे कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. किरण गरड, जिल्हा सनियंत्रण व मुल्यमापन अधिकारी किशोर तादळे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी अर्जून लाकाळ आदीसह आरोग्य विभागाचे अधिकारी –कर्मचारी उपस्थित होते.

From around the web