परंड्यात कोविडने २४ तासांत १० जण दगावले

वाशी येथे आढळला म्युकरमायकोसिसचा रुग्ण
 
corona
२५९ केमिस्ट्सना कोरोनाची लागण, १६ दगावले

 परंडा -  उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर  सुरूच आहे. परंडा उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमध्ये २४ तासात १० कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.  मात्र, कोरोना पोर्टलवर यासंदर्भात पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून, उर्वरित पाच जणांच्या मृत्यूचे ऑडिट होणार असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

परंडा तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत संसर्ग वाढल्याने मृत्यूचे प्रमाण देखील वाढले असून, वर्षभरात एकूण ३९७३ कोरोना बाधित रुग्ण निघाले. त्यापैकी ३५३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आत्तापर्यंत १३१ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या ३१२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. परंडा येथील कोविड सेंटरमध्ये ५० बेड असून, ३० अॉक्सिजन, ५ व्हेंटिलेटर बेड आहेत. येथील कोविड सेंटरला आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी ३० अॉक्सिजन कॉन्संट्रेटर तसेच ६ लाख रुपयांची औषधे रुग्णांवर उपचार करण्यासाठी दिली आहेत. नुकतीच रुग्णालयास नवीन रुग्णवाहिका देण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर व आरोग्य कर्मचारी संख्या कमी असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे.
 
वाशी येथे आढळला म्युकरमायकोसिसचा रुग्ण

 उस्मानाबाद जिल्ह्यात वाशी येथे म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण आढळून आला आहे.  येथील ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी उपचारास सुरुवात झाली आहे.
शहरातील ४७ वर्षीय व्यक्तीस मार्चमध्ये कोरोनाची लागण होवून वाशी व उस्मानाबादेत उपचार झाल्यानंतर ती व्यक्ती कोरोनामुक्त झाली होती. एक महिन्यानंतर त्यांच्या डाव्या डोळ्यात म्युकरमायकोसिसची बाधा झाल्याचे निदान झाले. पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डोळ्याची शस्त्रक्रियाही पार पडली असून, शस्त्रक्रियेनंतर उपचारासाठी इंजेकशन उपलब्ध होत नसल्याने संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांनी वाशी येथील ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधला. 

वैद्यकीय अधीक्षक डॉ. कपिलदेव पाटील यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. के. पाटील डॉ. बोडके, डॉ. सचिन देशमुख यांच्याशी चर्चा करून इंजेकशन उपलब्ध झाले. जिल्हा पातळीवरून मिळालेल्या १० इंजेकशन व तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी प्रत्यक्षात उपचारास सुरुवात केली आहे. यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. विजयकुमार सूळ व कर्मचारी रुग्णांवर उपचार करत आहेत. पहिल्या दिवसाच्या उपचारानंतर त्यांची तब्येत स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. सध्या या रुग्णासाठी १० इंजेकशन उपलब्ध झाले आहेत. तरीही प्रतिदिन ५ या प्रमाणे त्यांच्यावर दोन आठवडे उपचार होणार असल्याने वेळेत इंजेकशन उपलब्ध होणे गरजेचे आहे.

२५९ केमिस्ट्सना कोरोनाची लागण, १६ दगावले

कोरोना संकटात डॉक्टरांच्या बरोबरीनेच २४ तास सेवा देणाऱ्या जिल्ह्यातील २५९ केमिस्ट्सना कोरोनाची लागण झाली असून यातील १६ जण दगावले आहेत. जीव धोक्यात घालून सेवा देत असूनही त्यांना दीड वर्षात फ्रंटलाइन वर्कर म्हणून तसेच शासनातर्फे विमा कवच प्राप्त झालेले नाही. लसीकरणात प्राधान्य मिळण्यासाठी लढा द्यावा लागला, बंद आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले, आता कोठे प्राधान्य मिळाले आहे.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेकांना क्षती पोहोचली आहे. प्रशासन व समाजातील अनेक घटक कोरोनाविरोधातील लढाईत २४ तास निरंतर योगदान देत आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी सुलभता निर्माण झाली आहे. अनेकजण कोरोनापासून मुक्त झाले आहेत. यामध्ये डॉक्टर्स, परिचारिका, पोलिस यांचा समावेश आहे. यातील अनेक घटकांना शासनाने विमा कवच दिले आहे. त्यांना फ्रन्टलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन अन्य सुविधाही उपलब्ध केल्या आहेत. मात्र, यासर्वामध्ये डॉक्टरांच्या बरोबरीने योगदान देणारे केमिस्ट अर्थात मेडिकल दुकानदार यापासून वंचित आहेत. अन्य फ्रन्टलाईन वर्करप्रमाणेच कोरोना विरुद्धच्या लढाईत मेडिकल दुकानदार अग्रेसर आहेत. त्यांचेही कोरोनाने मोठे नुकसान झाले आहे.

From around the web