उस्मानाबादेत जात पंचायतीच्या भयानक त्रास व जाचाला कंटाळून पती-पत्नीने घेतले विष
उस्मानाबाद - जात पंचायतीचा भयानक त्रास सहन न झाल्याने एका तरुण पती-पत्नीने विष प्राशन केले होते. यापैकी पतीची १४ व्या दिवशी प्राणज्योत मालवली. ही दुर्देवी व अत्यंत संतापजनक घटना उस्मानाबाद शहरात घडली आहे. संबंधित जात पंचायतीच्या तथाकथित पुढाऱ्यावर कारवाई करावी या मागणीसाठी नातेवाईकांनी रुग्णवाहिकेसह प्रेत थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात एकच गोंधळ उडाला. त्यामुळे पोलिसांना पाचारण केल्याने जिल्हाधिकारी परीसरात एक प्रकारे पोलिस छावणीचेच रुप प्राप्त झाले होते.
उस्मानाबाद तालुक्यातील पळसप येथील व ह. मु. काका नगर उस्मानाबाद येथे राहणारे सोमनाथ छगन काळे यांचे त्यांच्या मेहुणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन पारधी समाजातील काही पुढाऱ्यांनी जात पंचायत भरवून सोमनाथ यास २ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यापैकी २० हजार रुपये दंड देखील वसूल केले. मात्र उर्वरित १ लाख ८० हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यासाठी जात पंचायतीच्या पुढाऱ्यांनी सोमनाथकडे सतत तगादा लावला. विशेष म्हणजे जर तू पैसे देण्यास विलंब केलास तर तुझ्या वहिनीला नग्न करुन पंचासमक्ष तिच्यावर बलात्कार करण्यात येईल. तर तुझ्या डोक्यावर ५० किलो वजनाचा दगड ठेवण्यात येईल. उकळत्या तेलात तापविलेली कुऱ्हाड हातावर घ्यावी लागेल, आगी मोहोळाचा मध काढावे लागेल याबरोबरच मानवाची विष्टा देखील खावी लागेल. इतकेच नव्हे तर सोमनाथ यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
सतत दिल्या जाणाऱ्या व होत असलेल्या या जात पंचायतीच्या त्रासाला कंटाळून सोमनाथ व त्यांची पत्नी अनिता यांनी दि.२२ सप्टेंबर रोजी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ त्यांना रूग्णालयात दाखल केले. यापैकी सोमनाथ यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रूग्णालयात हलविण्यात आले. या दरम्यान अनिता यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र दि.५ ऑक्टोबर रोजी सोमनाथ यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणी जात पंचायतीचे म्होरके असलेल्या पुढारी यावर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रेतासह नातेवाईकांनी आक्रोश केला.
यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचे दंगल नियंत्रक पथक तात्काळ या ठिकाणी दाखल झाले तर पोलीस उपाधीक्षक अंजूम शेख, पोलिस निरीक्षक सुरेश बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली इतर पोलिसांचा चोख बंदोबस्त वाढविल्यामुळे शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. तर तहसीलदार गणेश माळी यांनी संबंधितावर गुन्हे दाखल करून या प्रकारे जात पंचायतीद्वारे करण्यात येणारे अन्याय, अत्याचार, जुलूम व घटना होणार नाहीत, यासाठी आवश्यक ती पावले उचलणार असल्याचे सांगितले.
पारधी समाजातील जात पंचायतीचे म्होरके असलेले लताबाई नामदेव काळे, नामदेव वसंत काळे, बप्पा वसंत काळे, दिगंबर काळे व पापा शिंदे (ईटकुर), जग्गु काळे व अरूण काळे (रा. सांजा) यांच्यावर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या सर्वांवर गुन्हे नोंद करून अटक केली तरच अशा अनिष्ट व बुरसटलेल्या परंपरा नष्ट होतील व त्यास पायबंद लागेल, अशा आर्त मागणीचा टाहो यावेळी उपस्थित पारधी बांधवातून ऐकायला मिळाला.