उस्मानाबाद जिल्ह्यात फक्त रविवारी जनता कर्फ्यू राहणार

लॉकडाऊन १५ जूनपर्यंत कायम
 
d

उस्मानाबाद  - कोरोना संकटाच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आदेश १५ जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. तर जनता कर्फ्यू फक्त रविवारीच कायम ठेवण्यात आला आहे. लॉकडाऊन संदर्भातील आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दि.३१ मे रोजी जारी केले आहेत . 

जिल्ह्याचा कोरोना कोरोना पॉझिटिव्हचा दर १८ टक्क्यापेक्षा जास्त असल्यामुळे लॉकडाऊन आदेश कायम ठेवण्यात आला आहे. १५ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत हे आदेश लागु असणार आहेत. यात वैद्यकीय, पशुवैद्यकीय सेवा, शितगृह, वखार सेवा सार्वजनिक वाहतूक, मालवाहतूक, पाणी पुरवठा सेवा नियमित सुरू राहणार आहे. खाजगी बसेस,खाजगी वाहनांना अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी राहील.  

सर्व किराणा दुकाने, भाजीपाला, फळ विक्री, दूध संकलन व वितरण, पशुखाद्य दुकाने स. ७ ते स. ११ पर्यंत सुरू राहील . सर्व बँका, डाक सेवा दु.२ पर्यंत ग्राहकांसाठी सुरू राहील. कृषी अवजारे, बियाणे, खताची दुकाने सकाळी ७ ते दु. २ या वेळेत चालू राहतील. तर रेस्टॉरंट, बार, हॉटेल ,खाद्य पदार्थांची दुकाने मिठाई, चिकन, मटण, मासे , अंडे विक्रेत्यांनी घरपोच सेवेस प्राधान्य द्यावे असे आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र सायं .६ पर्यन्त खुली ठेवावीत - प्रा.  बिराजदार

उस्मानाबाद  जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र कृषी व्यावसायिकांची दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यन्त खुली ठेवण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे यांना दि.३१ रोजी केली आहे .

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शेतकरी शहरी भागांमध्ये कृषी साहित्य, बी-बियाणे व कृषी अवजारे यांच्या खरेदीसाठी येत असतात. शेतीच्या मशागतीचे कामे करून वेळात वेळ काढून येणारे शेतकरी लॉकडाऊनमुळे वाहन मिळत नसल्याने मिळेल त्या वाहनाने पायपीट करतात. अशा परिस्थितीत कृषी सेवा केंद्र, कृषी साहित्य विकणारी दुकाने बंद राहिल्यास त्यांना नाहक त्रास होण्याची शक्यता आहे . 

संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी मान्सुन पुर्व शेतीची कामे संपवून पेरणीसाठी तयार असून शेतकऱ्यांना पेरणीसाठी खते, बि-बियाणे व इतर कृषी साहीत्य वेळेवर उपलब्ध होणे गरजेचे आहे. लॉकडाऊनमुळे खरेदीवर मर्यादा आल्या असून जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र व कृषी व्यावसायिकांची सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुली ठेवावीत त्यामुळे शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते कृषी साहीत्य खरेदीसाठी अडचण येऊ देऊ नये अशी मागणी प्रा. बिराजदार यांनी केली आहे.

From around the web