उस्मानाबाद जिल्हा रेड झोन मध्ये...  तरीही दिलासाजनक बातमी ... 

जिल्ह्यात ३० टक्के  ऑक्सिजन, ७० टक्के नॉर्मल बेड रिकामे
 
s

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ४२९० आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे ८९.६२  टक्के तर ‌मृत्यूचे २.२५ प्रमाण टक्के आहे. राज्यातील रेड झोन १५ जिल्ह्यामध्ये उस्मानाबादचा समावेश आहे. असे असताना, एक दिलासाजनक बातमी हाती आली आहे. जिल्ह्यातील ऑक्सिजनचे ९५४ पैकी २७४ म्हणजे ३० टक्के बेड रिकामे झाले होते तर ४५५९ पैकी ३०५८ म्हणजे ७० टक्के नॉर्मल बेड रिकामे झालेले आहेत. उपचाराखालील एकूण रुग्णसंख्या चार हजारांवर असली तरी प्रत्यक्षात रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दोन हजारांच्या आतच आहे.

 जिल्ह्यात प्रशासनाने सरकारी रुग्णालयासह खासगी कोविड रुग्णालये, सरकारी व खासगी कोरोना केअर सेंटरमध्ये एकूण ५ हजार ७५९ बेडची सोय केली आहे. मोठ्या प्रमाणावर बेडची उपलब्धता असतानाही गंभीर रुग्णांसाठी बेडची कमतरता जाणवत होती. अशा परिस्थितीत अनेकांना वेळेत उपचार मिळाले नाहीत. आता मात्र परिस्थिती काही प्रमाणात सुधारत असून, ऑक्सिजनचा पुरवठाही समाधानकारक तर ऑक्सिजनचे बेडही पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत आहेत. 

वास्तविक पाहता जिल्ह्यातील कोरेाना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना उपलब्ध नसलेल्या साधनसुविधांचीही आता मुबलक प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णांना उपचार मिळणे सोयीस्कर झाले आहे. गेल्या आठवड्यापासून रुग्णसंख्याही कमी होताना दिसत आहे. त्यामुळे सरकारी तसेच खासगी रुग्णालयातील बेड पुरेशा प्रमाणात शिल्लक आहेत. सोमवारी सायंकाळी जिल्ह्यातील ९५४ पैकी २७५ ऑक्सिजन बेड शिल्लक होते तर ४५५९ पैकी ३०५२ बेड रिमामे होते.ही बाब काही प्रमाणात समाधान देणारी असली तरी संकट अजूनही संपलेले नाही. नागरिकांनी सजग राहावे लागले, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

जिल्हा कोविड रुग्णालयात सर्वच गंभीर स्वरूपातील रुग्ण उपचाराखाली होते. दीड महिन्यापेक्षा अधिक दिवस ही स्थिती होती.साडेतीनशे खाटांची क्षमता असूनही जमेल त्या स्थितीत ४०० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार करण्यात आले. सोमवारच्या अहवालानुसार जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनचे ६२ बेड, ७८ आयसीयू बेड शिल्लक होते. काही प्रमाणात रुग्णालयातील यंत्रणेवरील ताण कमी होताना दिसत आहे. एकंदर जिल्ह्यातील खासगी व सरकारी रुग्णालयातील बेड आता हळहळू रिकामे होण्याची आशा आहे.

रुग्णसंख्या कमी होत असली तरी प्रत्यक्षात अनेक रुग्ण सध्या गंभीर अवस्थेत उपचाराखाली आहेत. त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे. जिल्ह्यात १३८ व्हेंटिलेटर असून, सोमवारी सायंकाळी यापैकी एकही व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हते. 


 

From around the web