ईटकूरमध्ये तोतया पोलिसाला ग्रामस्थांनी चोपले

 
ईटकूरमध्ये तोतया पोलिसाला ग्रामस्थांनी चोपले

कळंब - तालुक्यातील ईटकूरमध्ये पोलिस असल्याचा बनाव करून पैसे उकळणाऱ्या एका भामट्याला ग्रामस्थांनी चांगलेच चोपले. 'तुम्ही अवैध धंदे करत आहात’, असे म्हणून या  तोतयाने पोलिस असल्याचा बनाव करून इटकूर येथील  एका व्यक्तीकडून १० हजार रुपये उकळले होते. परंतु या भामट्याची हकिकत कळल्यानंतर ग्रामस्थांनी त्याला चोपत पोलिसांच्या ताब्यात दिले. 

ईटकूर येथील नारायण गंभीरे यांच्यावर दोन वर्षांपूर्वी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या माहितीचा गैरवापर करत त्या भामट्याने उस्मानाबाद पोलिसांत कार्यरत असून तुम्ही अवैध धंदे करत आहात. तडजोड करुन ५० हजार रुपये द्या. नाहीतर तुमच्याविरुद्ध कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार, अशी धमकी दिली. गंभीरे यांनी घाबरुन १० हजार रुपये दिले. दुसऱ्या दिवशी (२८ डिसेंबर) हा भामटा परत ईटकूरला आला.

 नारायण गंभीरे व त्यांचा मुलगा संतोष गंभीरे यांना उर्वरित ४० हजार रुपये मागितले. संतोष गंभीरे यांनी ओळखपत्र दाखवण्यास सांगितले. भामट्याने पोलिसांचे ओळखपत्र दाखवले. तसेच पत्रकार असल्याचे ओळखपत्रही दाखवले. त्यामुळे संतोष गंभीरे यांना संशय आला. हा भामटा पळून जात असताना ग्रामस्थांनी त्याला पकडून चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

वाशी तालुक्यातील मांडवा येथील विशाल अनिल काळे असे या भामट्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध पोलिस असल्याचा बनाव करणे व पैसे उकळल्याप्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे अधिक तपास करत आहेत.

From around the web