सोयाबीन बियाणेबाबत उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महत्वाची सूचना 

 
सोयाबीन बियाणेबाबत उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महत्वाची सूचना

 उस्मानाबाद - जिल्हयात मागील हंगामात सोयाबीन पीक काढणीच्या वेळी पाऊस झाल्याने काही प्रमाणात सोयाबीन (शेतक-यांकडील बियाणे उत्पादन असो किंवा कमर्शियल उत्पादन असो) भिजलेले आहे.त्यामुळे त्याचा बियाणे उगवण क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सद्या बाजारात सोयाबीनचा भाव तेजीत असल्याने शेतकऱ्यांकडील सर्व सोयाबीन विकण्याची शक्यता आहे. तसेच बियाणे उत्पादक कंपन्याकडून सोयाबीन बियाण्याचे दर मागील वर्षीपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले चांगले सोयाबीन बियाणे घरगुती उगवणशक्ती तपासून पेरणीसाठी आवश्यक आहे. तेवढे राखून ठेवावे ,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

त्यासाठी पुढीलप्रमाणे खबरदारी घ्यावी.सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक असल्याने जिल्हयात पेरण्यात येणारे बियाणे हे सरळ वाणाचे आहे, त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. मागील दोन वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित होणारे सोयाबीन हे बियाणे म्हणून शेतक-यांनी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित चांगल्या प्रतीच्या बियाण्यांची चाळणी करुन निवड करावी. 


सोयाबीन बियाण्याची बाहयआवरण नाजूक व पातळ असल्याने त्याची हाताळणी काळजीपूर्वक करावी. साठवणूक करण्यापूर्वी बियाणे 2-3 दिवस उन्हामध्ये ताडपत्री,सिमेंटच्या खळयावर पातळ पसरुन चांगले वाळवावे व बियाण्यातील आद्रतेचे प्रमाण 9 ते 12 टक्यापर्यंत आणावे. सोयाबीन बियाणे साठवणूक करण्यासाठी बियाण्याची घरगुती पध्दतीने उगवणशक्ती तपासावी आणि किमान 70 टक्के उगवणशक्ती असलेले बियाणे योग्य पध्दतीने साठवणूक करावे.

         वाळलेल्या बियाण्यातील शेंगा, फोलपटे, काडीकचरा, माती खडे इत्यादी काढून ते स्वच्छ करावे. स्वच्छ केलेले बियाणे चांगल्या,नवीन पोत्यात साठवून ठेवावे.सोयाबिन बियाणे हवेतील आर्द्रता लवकर शोषून घेते.त्यामुळे साठवणुकीचे ठिकाण थंड किंवा ओलविरहीत व हवेशीर असले पाहिजे.साठवणुकीसाठी प्लास्टिक पोत्यांचा वापर करु नये.बियाणे साठवताना त्याची थप्पी सात फुटांपेक्षा जास्त असणार नाही याची काळजी घ्यावी.बियाणे 100 किलोच्या पोत्यामध्ये भरलेले असल्यास साठवणूक करताना चार पोत्यांपेक्षा जास्त व 40 किलोच्या पोत्यामध्ये भरलेले असल्यास आठ पोत्यांपेक्षा जास्त मोठी थप्पी लावू नये. अन्यथा सर्वात खालच्या पोत्यातील बियाण्यावर जास्त वजन पडून बियाणे फुटून त्याची उगवण शक्ती कमी होते.पोत्यांची थप्पी जमिनीपासून 10 ते 15 सेंटिमीटर उंचीवर लाकडी फळयांवर लावावी.

पोत्यांची रचना उभ्या-आडव्या पध्दतीने करावी,म्हणजे हवा खेळती राहून बियाण्यांची गुणवत्ता व उगवणशक्ती जास्त काळ टिकण्यास मदत होते.आवश्यकतेनुसार बियाणे साठवण केलेल्या खोलीमध्ये किटकनाशके व बुरशीनाशकांचा वापर करावा. तसेच उंदराचा उपद्रव टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी.सोयाबीन बियाण्याच्या पोत्यांची हाताळणी व वाहतूक काळजीपूर्वक करावी.पोती उंचावरुन आदळली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.

         अधिक माहितीसाठी आपल्या गावच्या कृषी सहायक,कृषी पर्यवेक्षक,मंडळ कृषी अधिकारी तसेच संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यु.आर.घाटगे यांनी केले आहे.

From around the web