जळकोटमध्ये अवैध धंदे बोकाळले...
जळकोट - नळदुर्ग पोलीस स्टेशनचे निष्किय आणि भ्रष्ट सपोनि जगदीश राऊत यांच्या आशीर्वादामुळे जळकोटमध्ये गावठी ( हातभट्टी ) दारू विक्री, मटका, जुगार, गुटखा विक्री खुलेआम सुरु आहे. मटका आणि जुगाराच्या नादी लागून तरुण पिढी बरबाद होत असताना, पोलिसांचे खिसे मात्र गरम होत आहेत.
जळकोटच्या केदारलिंगनगर झोपडपट्टीत दोन ठिकाणी गावठी ( हातभट्टी ) दारू विक्री राजरोस सुरु आहे. दारू पिऊन तळीराम आपल्या बायकापोरांबरोबर भांडण करून संसार मोडत असले तरी पोलिसांचे संसार मात्र फुलत आहेत.
जळकोटवाडी रोड ( उमरगा जनता बँकेच्या पाठीमागे ) भागात जुगाराचे दोन अड्डे खुलेआम सुरु आहेत. येथे तिरट नावाचा जुगार सुरु असून, तरुण पिढी जुगाराच्या नादी लागून बरबाद होत आहे, मात्र पोलीस डोळे असून आंधळ्यासारखे गप्प आहेत.
बस स्टॅन्ड परिसरात अनेक पानटपरीवर मटक्याचे बुकिंग सुरु आहे. कल्याण - मुंबई मटक्याच्या नादी लागून अनेकांच्या संसाराची राखरांगोळी होत आहे.
गुटखा विक्रीस बंदी असली तरी जळकोटमधील अनेक पान टपरीवर गुटखा खुलेआम विकला जात आहे. गोळ्या - बिस्कीट दुकानातही गुटख्याच्या पुड्या सहज मिळत आहेत.
या अवैध धंदेवाल्याकडून दरमहा हप्ता मिळत असल्याने 'तेरी भी चूप, मेरी भी चूप' असा अर्थपूर्ण व्यवहार सुरु आहे. नळदुर्गचे निष्क्रिय सपोनि जगदीश राऊत यांच्या आशीर्वादामुळे गुन्हेगार निर्ढावले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी भ्रष्ट सपोनि राऊत यांची मुख्यालयात उचलबांगडी करावी, अशी मागणी होत आहे.