अवैध मद्य विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

तिघांना गजाआड करीत ३ लाख ९८ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त
 
as
उस्मानाबादच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

उस्मानाबाद -  लॉकडाऊन असताना देखील अवैध व परराज्यातील विदेशी मद्य विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे. लातूर येथे अवैधरित्या विक्री करण्यातसाठी साठवणूक केलेल्या दोन ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी दि.३१ मे व १ जून रोजी रात्री अचानकपणे धाड टाकून त्या टोळीचा पर्दाफाश करून तिघांना गजाआड केले आहे.

 कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यविक्री प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक उषा वर्मा, अधिक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यात अवैध बेकायदेशीर मद्यविक्री निर्मिती व वाहतूक या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम सुरू असून दि.३१ मे रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ८८/२०२१ मध्ये १२ नंबर पाटी, पेट्रोल पंपाजवळ पत्र्याच्या शेडमध्ये धाड टाकून १६२ लिटर गोवा निर्मित विदेशी मद्य व एक टाटा टियागो चार चाकी वाहन क्रमांक एम.एच. २४ एएस-३२५४ असा एकूण २ लाख २१ हजार ५०० रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त केला व सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील तळेगाव येथील लक्ष्मण मसु शिखरे वय २६ वर्षे या आरोपीला अटक केली आहे. 

  दि.१ जून रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास या विभागाने लातूर तालुक्यातील पूर रोड येथील एस.के. ट्रेडर्स या पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकून गोवा राज्य निर्मित २६२ लिटर अवैध मद्यसाठा व एक अल्टो कार चार चाकी वाहन क्रमांक एमएच- २४ व्ही- २०१४ असा एकूण १ लाख ७७ हजार ३२० रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त केला. तर  आरोपी दत्ता श्रीरंग कावळे वय - ३८ बोधे नगर व रजनीकांत कावळे वय ३५ बसवेश्वर गल्ली, आझाद चौक दोघे रा.लातूर या दोघांना अटक करण्यात आली आहे. 

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे अध्यक्ष गणेश बारगजे, लातूर निरीक्षक राहुल बांगर, उदगीर निरीक्षक महादेव झेंडे, जवान अनिरुद्ध देशपांडे, निलेश गुणाले, हनुमंत मुंडे, सुरेश काळे, श्रीकांत साळुंके व एकनाथ फडणीस यांनी केली आहे. ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असून अवैध व परराज्यातील मद्य विक्री वाहतूक होत असल्यास त्याबाबतची माहिती या कार्यालयास देण्यात यावी असे आवाहन बारगजे त्यांनी केले आहे.

From around the web