लेआऊट मंजूर नसताना नियमबाह्य आणि बेकायदेशीर खरेदी दस्त

उस्मानाबाद - प्लॉटचे अंतिम लेआऊट मंजूर नसताना नियमबाह्य आणि बेकायदेशीर खरेदी दस्त करून दिल्याप्रकरणी सह. दुय्यम निबंधक वर्ग - २ यांच्यावर कायदेशीर कार्यवाही प्रस्तावित करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सह. जिल्हा निंबधक तथा मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.या प्रकरणामुळे रजिस्ट्री ऑफिसमधील खाबुगिरी चव्हाट्यावर आली असून, अनेक बेकायदेशीर खरेदी दस्त उघडकीस येण्याची शक्यता आहे.
शहरातील समर्थ नगर भागात जीवन गणपतराव पाटील यांनी सर्व्हे नंबर २०८ मध्ये क्षेत्र ३४४० चौ. मीटरचे प्लॉटिंग करून त्याची विक्री केली आहे. या प्लॉटिंगमध्ये विकास कामे, रस्ते, गटारी, लाईट, पाणी आदी कामे बाकी आहेत. तरीही त्यांनी प्लॉट विकले होते.
प्लॉटचे अंतिम लेआऊट नसताना नियमबाह्य आणि बेकायदेशीर खरेदी दस्त करून दिले म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे लेखी तक्रार केली होती.हा खरेदी दस्त नियमबाह्य आणि बेकायदेशीर असल्याने रद्द करावा तसेच संबंधितांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही प्रस्तावित करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. या मागणीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी वरील आदेश काढला आहे.
उस्मानाबादच्या रजिस्ट्री ऑफिसमध्ये अनेक नियमबाह्य प्लॉट , शेती यांचे बेकायशीर खरेदी दस्त झाल्याचा आरोप सुभेदार यांनी केला आहे. चिरीमिरी दिल्याशिवाय कामे होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.