वैद्यकीय अधिकार्‍यास मारहाण करणार्‍यांना अटक न झाल्यास सोमवारपासून कामबंद आंदोलन

राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदन
 
s

धाराशिव- जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नवनाथ बाबासाहेब घुले यांना बेदम मारहाण करणार्‍या आरोपींना अटक करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे आज (दि.3) निवेदनाद्वारे केली आहे. आरोपीला अटक न झाल्यास सोमवार, 7 ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात म्हटले की, तेरखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ.नवनाथ घुले यांना दि. 1 ऑगस्ट रोजी गावगुंडांनी घेराव घालून अरेरावीची भाषा वापरून बेदम मारहाण केली. प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आरोपींना अटक होईपर्यंत आम्ही तीन दिवस काळ्या फिती लावून कामकाज करू व त्यानंतरही कारवाई न झाल्यास सोमवार, 7 ऑगस्टपासून अत्यावश्यक सेवा वगळून कामबंद आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्याचबरोबर रूग्णसेवेवर परिणाम झाल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या आंदोलास एनआरएचएम संघटना आणि आशा संघटनेने पाठींबा जाहीर केला आहे.

e

यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ.महेश गुरव, सचिव डॉ.रोहीत राठोड, डॉ.एन.के. गुंड, डॉ.सचिन पाटील, डॉ.सी.आर. बडे, डॉ.प्रवीण घंदुरे, डॉ. राजेश गाडे, डॉ.एस.डी. मुंढे, डॉ.व्ही.व्ही. सातपुते, डॉ.विनयशील कुलकर्णी, डॉ.सुजित राऊत, डॉ.श्याम पाटील, डॉ.एम.एस. बेंबळगे, डॉ.नौमान शेख, डॉ.एस.एस. जाधव, डॉ.शिंदे, डॉ.माने, डॉ.चाळक, डॉ.मेंढेकर, डॉ.घाडगे, डॉ.आयवळे, डॉ.पुंडे, डॉ.चव्हाण, युनानी डॉक्टर्स संघटनेचे डॉ.शकील अहमद खान तसेच श्री.बारकुल, श्री.गवळी, श्री.गिरी आदीसह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

तेरखेडा येथील वैद्यकीय अधिकार्‍यांना मारहाण प्रकरणी कास्ट्राईब वैद्यकीय अधिकारी संघाचे आ.पवार यांना निवेदन

धाराशिव- वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नवनाथ घुले यांना गावातील काही लोकांनी मारहाण केली. या प्रकरणात गुन्हा नोंद होऊनही आरोपींना अटक झालेली नाही. आरोपींना तत्काळ अटक करावी अन्यथा कामबंद आंदोलन करणार असल्याचे निवेदन कास्ट्राईब राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघाच्या वतीने आमदार रोहीत पवार यांना पाठविण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, प्राथमिक आरोग्य केंद्र तेरखेडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.नवनाथ घुले यांना गावातील उपद्रवी लोकांनी मारहाण केली. या प्रकरणात 01 ऑगस्ट रोजी रोजी गुन्हा दाखल झालोला आहे. परंतु अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर्स करत आहेत. सरकारने वैद्यकीय अधिकार्‍यांवर यांच्यावर हल्ले होऊ नये यासाठी कठोर कायदा करायला हवा. अशा प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षेची तरतूद करायला हवी जेणेकरून अन्य घटना यापुढे घडणार नाहीत. तसेच जिल्हास्तरीय सुरक्षा समितीची मीटिंग प्रत्येक महिन्याला घेण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. आरोपींना अटक न झाल्यास आम्ही 15 दिवस काळी फीत लावून आंदोलन करणार असून त्यानंतर कामबंद आंदोलन करणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष डॉ.दत्ता तपसे, कार्याध्यक्ष डॉ.नीलेश भालेराव, उपाध्यक्ष डॉ.आकाश राठोड, सचिव डॉ.नितीन मोरे, सदस्य डॉ.नवनाथ घुले, डॉ.सी.एस. कोकाटे व इतर पदाधिकार्‍यांची स्वाक्षरी आहे.
 


 

From around the web