होर्टीत हातभट्टीची दारू विक्री जोरात
नळदुर्ग - नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जवळपास ८५ गावे आहेत, या सर्वच गावात सपोनि जगदीश राऊत यांच्या आशीर्वादामुळे अवैध हातभट्टीची दारू विक्री, जुगार, मटका, गुटखा विक्री जोरात सुरू आहे.
नळदुर्ग - अक्कलकोट रोडवर पाटील तांडा आहे, या तांड्यावर लाखो लिटर हातभट्टीची गावठी दारू गाळप केली जाते, हीच दारू सगळीकडे वितरित केली जाते. होर्टी गावात कारने हातभट्टीची गावठी दारू सप्लाय केली जात आहे.
होर्टी येथील भीमनगरमध्ये दोन ठिकाणी आणि मातंग वस्तीत एका ठिकाणी हातभट्टीची गावठी दारू राजरोस विकली जात आहे. जिल्हा परिषद शाळेजवळ आणि होर्टी मुख्य चौकातही दारू विक्री होत असताना पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. दारूमुळे अनेकांचे लिव्हर खराब झाले आहेतच पण संसाराची राखरांगोळी होत आहे. या दारू विकणाऱ्या लोकांचे आणि पोलिसांचे लागेबांधे असल्याने कोणतेही कारवाई होत नाही.
डिझेल प्रकरणात पोलिसांचे हात ओले
नळदुर्ग - अक्कलकोट रस्त्याचे सध्या चौपदरीकरण सुरु आहे. हा रस्ता तयार करणाऱ्या एका खासगी कंपनीच्या ऑफिसमधून काही दिवसापूर्वी डिझेल चोरी गेले होते. या प्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली होती, पण त्यांना दुसऱ्याच दिवशी सोडून दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणी पोलिसांचे हात ओले झाल्याची चर्चा रंगली आहे.
पोस्को प्रकरणात मिटवामिटवी
नळदुर्गमधील एका तरुणाने भावकीतीलच एका अल्पवयीन मुलीवर तुळजापुरात नेवून बलात्कार केला होता. पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतल्यानंतर त्यांची फिर्याद नोंदवून घेण्यात आली नाही. पोलिसांनी मुलाच्या नातेवाईकाकडून चिरीमिरी उकळून हे प्रकरण आपसात मिटवले पण नंतर मुलीला वाऱ्यावर सोडण्यात आले.