कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना
उस्मानाबाद - राज्यात तसेच देशात कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ होताना दिसून येत आहे. कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने केंद्र शासनाने तसेच राज्य शासनाने वेळोवेळी विविध मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.त्यानुसार कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण वाढविण्याबाबत शासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यामध्येही या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध लादण्याची आवश्यकता निर्माण होऊ नये.यासाठी शासनाकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन नागरिकांनी करावे म्हणून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून श्री.दिवेगावकर यांना प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार जिल्ह्यातील करोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने दि.27 नोव्हेंबर 2021 रोजी दिलेल्या आदेशान्वये मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन संपूर्ण जिल्ह्यात पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत आदेशित करण्यात येत आहे.
कोविड अनुरुप आचारणाचे पालन- प्रत्येक नागरिकांने कोविड अनुरुप आचरणाबाबत केंद्र आणि राज्य शासनामार्फत निर्गमित मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे. यामध्ये सर्व सेवा प्रदाते, परिसरांचे मालक, परवानाधारक,आयोजक तसेच अभ्यागत, सेवा घेणारे ग्राहक, अतिथी यांनी कोविड अनुरुप आचरणाचे पालन करावे.कोविड अनुरुप आचरणाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध शासन नियमानुसार दंडणीय,कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
पूर्ण लसीकरणाची आवश्यकता :- कोणत्याही कार्यक्रमांना उपस्थित नागरिक तसेच सर्व सेवा प्रदाते, खेळाडू, कलाकार, इत्यादींशी संबंधित सर्व व्यक्ती, अभ्यागत, अतिथी, ग्राहक यांनी कोविड-19 लसीकरण केले आहे याबाबत खात्री करुनच कार्यक्रम घेतला जाईल याची नोंद घ्यावी.कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, कार्यक्रम, मेळावा इत्यादी जेथे सार्वजनिक सभासदांना किंवा नागरिकांना येण्याचा आणि सेवा घेण्याचा अधिकार आहे तेथील सर्व काम करणा-या व्यक्तींचे लसीकरण झालेले असावे. आणि अशा ठिकाणचे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचे पूर्ण लसीकरण झालेले असावे.पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक वापरता येईल.
राज्य शासनाने लसीकरणानंतर उपलब्ध करुन दिलेला युनिर्व्हसल पास (https://epassmsdma.mahait.org or telegram-MahaGovUniversalPass Bot) हा पूर्ण लसीकरण झाल्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. तसेच लसीकरण झाल्याचे कोविन पोर्टलवरील प्रमाणपत्र आणि सोबत ओळखपत्र हे प्रमाण मानले जाईल. अठरा वर्षाखालील मुलांकरिता शाळेचे ओळखपत्र तसेच लसीकरण घेण्यासाठी वैद्यकीय कारणामुळे असमर्थ असणाऱ्यांकरिता त्यांच्या डॉक्टरांचे या बाबतचे प्रमाणपत्र प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाईल.
संपूर्ण लसीकरणाची व्याख्या:-पूर्ण लसीकरण झालेले म्हणजे अशी व्यक्ती ज्याने कोविड-19 लसीच्या दोन्हीही मात्रा घेतलेल्या असून दुसरी मात्रा घेवून 14 दिवस पूर्ण झालेले आहेत.वैद्यकीय कारणामुळे लसीकरण घेण्यास असमर्थ असणारी व्यक्ती ज्यांच्याकडे त्यांच्या डॉक्टरांचे याबाबतचे प्रमाणपत्र उपलब्ध आहे.अठरा वर्षे वयापेक्षा कमी वय असलेली व्यक्ती.सर्व संबंधित यंत्रणांनी सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी तात्काळ करावी.