पिक विम्याबाबत पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करावा...
उस्मानाबाद - खरीप २०२० मध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. मुख्यमंत्री, कृषी मंत्री यांनी मदतीचे आश्वासन देऊन देखील दुर्दैवाने आजही जिल्ह्यातील शेतकरी हक्काच्या पीक विम्यापासून वंचित आहे. मुख्यमंत्री, कृषी मंत्री, कृषी आयुक्त, विमा कंपनी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, परंतु आजवर सोयाबीन पिकाचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे याबाबत कृषी मंत्री महोदयाकडे पीक विमा प्रतिनिधी व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांची प्रलंबित बैठक आयोजित करावी अशी मागणी आ.राणाजगजितसिंहजी पाटील यांनी काल झालेल्या खरीप आढावा बैठकीत पालकमंत्री शंकरराव गडाख साहेब यांच्याकडे केली.
तसेच महसुल विभागाने अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानी बाबत केलेल्या पंचनाम्याची माहिती घेऊन एक आठवड्यात विहित नमुन्यात सदरील माहिती विमा कंपनीला पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना केल्या.
अर्थसंकल्पीय अधिवेशना मध्ये पीक विम्याचा विषय विधानसभेत आक्रमकपणे मांडल्यानंतर कृषिमंत्र्यांनी महसूलचे पंचनामे ग्राह्य धरून शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचे विधानसभेत मान्य केले. याबाबत विमा कंपनीला राज्य सरकारकडून स्पष्ट निर्देश न देता कृषी आयुतांमार्फत पत्र देण्यात आले. परंतु विमा कंपनीने या पत्रा प्रमाणे कार्यवाही करण्यास असमर्थता दर्शवली.
यानंतर कृषिमंत्र्यांकडे संयुक्त बैठकीची मागणी केली परंतु त्यांनी आजवर बैठक बोलावली नाही, अथवा विमा कंपन्यांना स्पष्ट निर्देशही दिले नाहीत. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी महसूलच्या पंचनाम्याची माहिती घेऊन विहित नमुन्यात बाधित क्षेत्रासह शेतकऱ्यांची यादी विमा कंपनीला देणे अपेक्षित होते, परंतु आजवर ही माहिती देखील देण्यात आलेली नाही. त्यामुळे आठवड्याभरात सदरील माहिती विमा कंपनीला पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्याचे पालक या नात्याने शेतकर्यांना वार्यावर न सोडता त्यांना विमा मिळवून देण्यासाठी आपल्याकडून मदत होणे अपेक्षित आहे.
शासन व प्रशासन दोन्ही नुकसान झाल्याचे मान्य करतात, परंतु तरीही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळालीच पाहिजे यासाठी सर्वानीच प्रयत्न करणे गरजेचे असून कृषी मंत्री यांच्याकडे विमा कंपनी प्रतिनिधी व लोकप्रतिनिधी यांची प्रलंबित असलेली बैठक आयोजित करण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी पालकमंत्री नामदार शंकराव गडाख यांच्याकडे केली.