जिल्ह्यातील चार एअर ऑक्सीजन प्रकल्पास मंजुरी- पालकमंत्री शंकरराव गडाख

 
जिल्ह्यातील चार एअर ऑक्सीजन प्रकल्पास मंजुरी- पालकमंत्री शंकरराव गडाख

उस्मानाबाद - जिल्ह्यातील चार तालुक्यात एअर ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यास तात्काळ मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर, कळंब आणि परंडा येथे नव्याने एअर ऑक्सीजन प्लांट उभारणी होणार आहे.  पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री शंकराव गडाख यांनी याबाबत प्रशासनाला आढावा बैठकीत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार या चारही प्रकल्पास  जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजुरी दिलेली आहे.

जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन स्टोरेज टँक कार्यानवीत झाल्यानंतर जिल्ह्यातील चार ठिकाणी एअर ऑक्सीजन प्लांट कार्यान्वित करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. गडाख यांनी दिल्या होत्या. त्यानुसार प्रशासन तात्काळ कामाला लागले होते. जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर, कळंब आणि परंडा या चार उपजिल्हा रुग्णालय मध्ये हे चार एअर ऑक्सीजन प्लांट कार्यान्वित होणार आहेत.  हवेतून ऑक्‍सिजन निर्मिती या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे. 

एका प्लांट मधून दररोज सुमारे सव्वाशे सिलेंडर ऑक्सिजन तयार होण्याची एका प्लॅन्टची क्षमता असणार आहे. म्हणजेच एका  ठिकाणी 60 बेडला यातून  ऑक्सीजन पुरवता येणार आहे. म्हणजेच जिल्ह्यातील 240 बेडला ऑक्सिजन पुरवण्याची क्षमता या चारीही प्लांटची असणार आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांना आता  तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. यापूर्वी ऑक्सिजन बेडअभावी अनेक रुग्णांना वैद्यकीय सेवेसाठी लांबचा पल्ला गाठावा लागत होता.  काही वेळा रुग्णांच्या जीवावर बेतत  होते. यातून आता रुग्णांची सुटका होणार आहे.  जिल्ह्यातील हे चारही उपजिल्हा रुग्णालय सुसज्ज होणार असून  चारही प्लांटची तात्काळ उभारणी करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.

From around the web