उस्मानाबादला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अखेर मंजूर 

 उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास  पाटील यांच्या प्रयत्नाला अखेर यश
 
उस्मानाबादला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अखेर मंजूर

उस्मानाबाद - उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास  पाटील यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे. उस्मानाबाद येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यास संलग्न 430 खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 

उस्मानाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे, अशी अनेक दिवसापासून मागणी होती. त्यासाठी उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास  पाटील यांनी पाठपुरावा केला होता. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. अखेर उस्मानाबादला 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यास संलग्न 430 खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 

या प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी एकूण रुपये 674.14 कोटी (अनावर्ती खर्च सुमारे रुपये 429.63 कोटी व आवर्ती खर्च सुमारे रूपये 244.51 कोटी) इतका निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच आवश्यक तेवढी पदनिर्मिती करण्यास आणि पदे भरण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे.

नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकरिता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय आणि क्षय रुग्णालय स्थावर जंगम मालमत्तेसह तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास निशुल्क वापरास उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात  आली आहे.

याशिवाय हे वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय सार्वजनिक खाजगी भागिदारी (PPP) तत्वावर स्थापन करण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली आहे.


उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव 

CMOMaharashtra या अधिकृत फेसबुक  पेजवर उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबादच्या नामांतराला पाठींबा दिला आहे. मात्र यावरून काँग्रेसची भूमिका काय राहील, याकडे लक्ष वेधले आहे. 

From around the web