शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयाकरिता पद निर्मितीस शासनाची मान्यता
धाराशिव ( उस्मानाबाद) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालया करिता गट अ ते गट ड मध्ये एकूण 986 पदे निर्मिती करण्यास व भरण्यास तसेच त्या पोटी येणाऱ्या रुपये 100.57 कोटी अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
मागील वर्षी धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास 100 विद्यार्थी प्रवेशास भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने मान्यता होती. मात्र यावर्षी दुसरे वर्ष सुरू होत असल्याने पद निर्मितीची मंजुरी अत्यावश्यक होती. या अनुषंगाने तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीषजी महाजन व विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा होता.
100 विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून 430 रुग्ण खाटांच्या रुग्णालयासाठी गट अ ते ड ची 986 पदे निर्मितीस शासनाने मान्यता दिली असून यासाठी रुपये 100.57 कोटी खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे. या मध्ये गट अ ते क ची नियमित 520 पदे, त्याचप्रमाणे गट क ची 37 काल्पनिक पदे व गट ड ची 429 कंत्राटी पदे बाह्य यंत्रणेद्वारे अशा 986 पदांचा समावेश आहे. सदरील पदे चार टप्प्यात भरण्यात येणार आहेत. प्रथम वर्षासाठी आवश्यक पदे तात्काळ भरून आवश्यकतेप्रमाणे पुढील पदे भरण्यात येणार आहेत.
पदनिर्मितीस मंजूरी मुळे जिल्हावासीयांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार आहे, त्याच बरोबर एवढ्या मोठ्या भरतीमुळे व बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे येथील अर्थकारणाला चालना मिळणार आहे. याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी महायुती सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.