बारावी उत्तीर्ण व पदवीधर तरुणांना बेरोजगार भत्ता द्या... 

- ॲड रेवण भोसले
 
बारावी उत्तीर्ण व पदवीधर तरुणांना बेरोजगार भत्ता द्या...

उस्मानाबाद - बेरोजगारीच्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन बारावी उत्तीर्ण व पदवीधर तरुणांना बेरोजगार भत्ता सुरू करण्याची मागणी जनता दल सेक्युलर पक्षांचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

देशातील बेरोजगारीच्या प्रश्नाने आता गंभीर स्वरूप धारण केले आहे .हाताला काम नसलेल्या बेरोजगार तरुणांच्या झुंडी सर्वत्र दिसत आहेत. स्वतःच्या भवितव्याची चिंता आणि त्यातून आलेले नैराश्य यांनी या तरुणांना ग्रासले आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती फारशी वेगळी नाही .करोनामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असली तरी त्या आधीपासूनच राज्य सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे अर्थ व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. 

या परिस्थितीत सुधारणा होण्याची मुळीच शक्यता नाही. उद्योग व्यवसाय बंद झाल्यामुळे लाखो लोकांवर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. याच वर्गाला पुन्हा रोजगार मिळणे अवघड असताना रोजगाराच्या अपेक्षेत असलेल्या नव्या सुशिक्षित तरुणांचे भवितव्य तर आणखीनच अवघड झाले आहे .पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पुढील किमान तीन ते पाच वर्ष नोकरी मिळविण्यासाठी या तरुणांना भटकावे लागत आहे .आज असे हजारो तरुण बेरोजगार असून त्यांच्या क्षमतेचा कोणताही वापर देशाच्या विकासासाठी होत नाही .हाताला काम नसल्याने या तरुणांना नैराश्याच्या सावटाने ग्रासले आहे.

 स्वतःच्या भवितव्याची चिंता त्याला भेडसावत असते. त्यामुळे आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग तरुणांनी अवलंबिल्याच्या बातम्या कानावर येत असतात .त्यातून या तरुणांना बाहेर काढायचे असेल तर त्यांच्या हाताला काम मिळायला हवे. व्यवसाय कराच्या माध्यमातून राज्य सरकारकडे दरवर्षी हजारो कोटी रुपये जमा होत असतात. मात्र बऱ्याचदा अन्य गोष्टीसाठीच यातील निधी वळती केला जात असतो .त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना किमान तीन वर्षे रोजगाराची हमी द्यावी तसेच रोजगार देता येत नसेल तर सुशिक्षित बेरोजगारांना पाच ते दहा हजार रुपये (बारावी उत्तीर्ण पर्यंत व पदवीधर) बेरोजगार भत्ता किमान तीन वर्षे देण्यात यावा असेही ॲड भोसले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
 

From around the web