केंद्राकडून ग्रामीण कोविड केअर सेंटर वर आता भर...

तेरचा प्रस्ताव, इतर ५४ सुरु करण्याचा निर्धार...

 
केंद्राकडून ग्रामीण कोविड केअर सेंटर वर आता भर...

उस्मानाबाद - ग्रामीण भागात वाढत असलेल्या कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता उस्मानाबाद जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये कोविड केअर सेंटर सुरु करण्याचे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दि. २४.०४.२०२१ रोजी जनतेस केले होते. तसेच याबाबत दि.२६.०४.२०२१ रोजी झालेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीत प्रस्ताव मांडला होता. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून आयसोलेशन सेंटरला परवानगी देण्यात आली होती व जिल्ह्यातील अंदाजे १८ गावांमध्ये अशी अलगीकरण केंद्र सुरु करण्यात आली. 

काल दि.१६.०५.२०२१ रोजी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने परिपत्रकाद्वारे नवीन उपाययोजना सुचवत असताना ग्रामीण भागात कोविड केअर सेंटर सुरु करण्याबाबत भर दिला आहे. तसेच प्रत्येक केंद्रात अनिवार्य सुविधा, आरोग्य कर्मचारी व इतर बाबी सुस्पष्ट करण्यात आल्या आहेत. यामुळे सध्या चालू असलेल्या अलगीकरण केंद्रांना अधिकच्या सुविधा उपलब्ध करून ग्रामीण कोविड केअर सेंटर मध्ये रुपांतरीत करीत कोरोनाच्या लढ्यात एक निर्णायक पाऊल पुढे घेतले जाणार आहे.

आज तेरमध्ये ७० खाटांचे अलगीकरण केंद्र कार्यान्वित आहे. लोकसहभाग व प्रशासनाच्या सहकार्याने चालू असलेले हे केंद्र कोविड केअर सेंटर मध्ये रुपांतरीत करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. तेर सह प्रत्येक जिल्हा परिषद गट निहाय एक कोविड केअर सेंटर सुरु करण्याची गरज असल्याचे अधोरेखित करत तसा निर्धार आ. पाटील यांनी व्यक्त केला. नवीन निकषाप्रमाणे कोविड केअर सेंटर साठी किमान २ खाटांना ऑक्सिजन सुविधा, २४ x ७ ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिकेची सेवा, रॅपिडअॅटिजन टेस्टची सोय, संशयित रुग्णांसाठी वेगळा कक्ष व पर्याप्त औषधांचा साठा उपलब्ध करणे अनिवार्य आहे.

पुढील संभावित कोरोना लाटेचा सामना करण्यासाठी ग्रामीण भागात असे सुसज्ज कोविड केअर सेंटर सुरु करणे अत्यंत गरजेचे असून यासाठी आवश्यक खाटा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आजवर अशा प्रकारे १४ केंद्रांना खाटा वितरीत करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद सदस्यांसह ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी व प्रमुखांनी कोविड केअर सेंटर सुरु करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. 

From around the web