शासनाच्या अत्यल्प अनुदानामुळे शेतक-यांनी नाउमेद होवू नये

वाढीव मदतीसाठी दिवाळीनंतर लढा उभारु - आ.राणा जगजितसिंह पाटील
 
शासनाच्या अत्यल्प अनुदानामुळे शेतक-यांनी नाउमेद होवू नये

उस्मानाबाद - अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीपोटी हेक्टरी रु.२५००० व ५०००० मदतीची मागणी करणारे मुख्यमंत्री झाल्याने शेतकऱ्यांच्या मोठया अपेक्षा होत्या. परंतु प्रत्यक्षात जिरायती व बागायती पिकांसाठी हेक्टरी रु.१०००० व फळ पिकांसाठी रु.२५००० अशी तोकडी रक्कम मंजुर करण्यात आली आहे. त्यात देखील केवळ ५० टक्के रक्कमच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. खरवडलेली जमीन, दगावलेली जनावरे, घरांचे नुकसान यापोटी स्थायी आदेशाप्रमाणे जुजबी अनुदान मिळत आहे, परंतु विहरीत गेलेला गाळ काढण्यासाठी, ठिबक व तुषार संचाचे झालेले नुकसान, विद्दयुत पंपाचे झालेले नुकसान यांचा अजुन पर्यंत कोठे विचार झालेला नाही.

खरवडुन गेलेल्या जमीनीच्या दुरुस्तीसाठी लागणाऱ्या रकमेच्या तुलनेत अत्यल्प रक्कम दिली जात आहे. यासाठी घालण्यात आलेली दोन हेक्टरची मर्यादा अन्यायकारक आहे. विमा उपलब्ध नसलेल्या पिकांना भरीव मदतीची अपेक्षा होती, परंतु ती देखील फोल ठरली आहे. अशा परीस्थीतीत शेतकऱ्यांनी निराश होणे स्वभाविक आहे, परंतु अधिकची मदत मिळवुन घेण्यासाठी दिवाळी नंतर राज्य सरकारच्या विरोधात लढा उभा करु, बळीराजाने नाउमेद होऊ नये असे आवाहन आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

खरवडुन गेलेली सर्व जमीन शासकीय योजना व खर्चातुन दुरुस्त करुन घेणे, झालेल्या नुकसानीपोटी अधिकची मदत मिळवुन देणे, विहीरीतील गाळ, ठिबक, तुषार संच, विद्दयुत पंप व इतर अवजारांचे झालेले नुकसान यासाठी मदत मिळवुन देणे व योग्य प्रमाणात पिक विमा नुकसान भरपाई मिळवुन देणे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे लागणार आहेत.

काही शेतकऱ्यांच्या नुकसान असुन देखील मदतीच्या यादीत नाव नसल्याच्या तक्रारी आहेत अशा शेतकऱ्यांनी तहसिलदार यांच्याकडे अर्ज करुन पोहोंच घ्यावी व याची प्रत ८८८८६२७७७७ या क्रमांकावर व्हॉटसअप करावी असे देखील आवाहन करण्यात येत आहे.

From around the web