लोहाऱ्यातील लोकमंगल साखर कारखान्याविरूध्द शेतकऱ्यांचे आंदोलन 

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा  पुढाकार 

 
x

लोहारा -   ऊस पाठवून आठ महिने झाले तरी लोकमंगल साखर कारखान्याने अजूनही शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत.अगोदरच कोरोनाने मेटाकुटीस आलेला शेतकरी पेरणीसाठी हवालदिल झाला असून हक्काचे पैसे ही मिळत नसल्याने उध्वस्त झाला आहे.आता याविरूध्द राष्ट्रवादी कॉग्रेस तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जगदीश पाटील यांनी तहसिलदारांना दिले आहे.

लोकमंगल साखर कारखाना भाजपचे नेते आणि माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मालकीचा आहे. एकीकडे भाजप कार्यकर्ते आघाडी सरकार विरुद्ध आंदोलन करीत असताना, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपच्या ताब्यात असलेल्या कारखान्याविरुद्ध आंदोलन करणार आहेत. 

घराघरात कोरोनाचे पेशंट निघत असताना शेतकऱ्यांना खाजगी सावकारांचे उंबरठे झिझवावे लागले परंतु पोटाला चिमटा मारून कष्टाने पिकवलेल्या ऊसाचे पैसे मिळालेच नाहीत.आता पेरणीसाठी उदारीने बी - बियाने ,खते किटकनाशके सारख्या इतर बाबीसाठी बळीराजा हवालदिल झाला आहे.उस्मानाबाद जिल्हा शेतकरी आत्महत्यांसाठी देशात आघाडीवर आहे.एका माजी सहकारमंत्र्यांच्या कारखान्याने शेतकऱ्यांची एवढी पिळवणूक करावी ही बाब योग्य नाही.शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, असे जगदीश पाटील म्हणाले. 

निवेदन देताना जिल्हा कोषाध्यक्ष जगदिश पाटील,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष आयुब शेख,तौफिक कमाल,ताहेर पठाण,सरफराज इनामदार ,अमित कांबळे आदी उपस्थित होते.

From around the web