प्रत्येक ग्रामपंचायतीने लोकसंख्येच्या तिप्पट झाडे लावावीत - डॉ.विजयकुमार फड

 
s

उस्मानाबाद  -  जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी त्या ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या एकूण लोकसंख्येच्या 3 पट झाडे लावण्याचे नियोजन करावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी सर्व ग्रामपंचायतीला दिले आहेत.

          मुलत: पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून वृक्षांचे महत्व अनन्य साधारण आहे. भारतीय संस्कृतीत पूर्वीपासून वृक्षाला खूप महत्व दिले आहे. तरीही अलिकडच्या काळात मोठया प्रमाणावर वृक्षतोड झाल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास वाढत चालला आहे.  सद्यस्थितीत उद्भवलेल्या कोव्हीड-19 परिस्थितीने रुग्णांना अत्यावश्यक असलेल्या ऑक्सीजनच्या माध्यमातून वृक्षांची महती पुन:श्च प्रकर्षाने जाणवून दिलेली आहे.  या सर्व बाबी विचारात घेता मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड होणे आवश्यक आहे.

          यासाठी ग्रामपंचायती अंतर्गत असणाऱ्या एकूण लोकसंख्येच्या किमान 3 पट झाडे या वर्षी लावून ती जगविणेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.फड यांनी सर्व सरपंच, ग्रामसेवक यांना कळविले आहे.  लोकसंख्येच्या तिप्पट हे उद्दिष्ट समजून या उद्दिष्टाची पूर्तता करावयाची आहे.  यामध्ये घन वन लागवड, गाव तेथे देवराई, रस्ता दुतर्फा लागवड, सार्वजनिक विहिरीच्या भोवती लागवड, स्मृती वन, शेताच्या बांधावर लागवड, शेतामध्ये लागवड, नदी नाले यांच्या काठावर लागवड, औषधी वनस्पतींची वने इ. विविध प्रकारे लागवड करुन उद्दिष्ट पूर्ण करणेबाबतही डॉ.फड यांनी निर्देश दिले आहेत.

          जिल्ह्याचे उद्दिष्ट योग्य प्रकारे पूर्ण करण्याच्या अनुषंगाने तालूक्याशी समन्वय ठेवता यावा या दृष्टीकोनातून डॉ.फड यांनी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अनिलकुमार नवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) नितीन दाताळ, तालूका संपर्क अधिकारी कार्यकारी अभियंता (बांधकाम) श्री.भोसले,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा.स्व) श्री.कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) डॉ.तुबाकले,  जिल्हा जलसंधारण अधिकारी,(ल.पा.) श्री.जोशी,  जिल्हा कार्यक्रम अधिकारी (म.बा.क.) श्री.निपाणीकर,  कृषि विकास अधिकारी डॉ.चिमणशेटे,  जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी  डॉ.आघाव,  कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु.) श्री.देवकर उपस्थित होते. यावेळी वृक्षारोपण नियोजन अनुषंगाने सर्व तालूकास्तरीय व ग्रामस्तरीय अधिकारी यांच्याशी विशेषरित्या संपर्क साधण्यात आला. 

From around the web