उस्मानाबाद जिल्ह्यातील रोजगार हमींच्या कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही

अधिकाऱ्यांनी भिती न बाळगता गुणवत्तापूर्ण कामे करावित : संदिपान भुमरे
 
s

उस्मानाबाद - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील जिल्ह्यातील कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही. अधिकारी  आणि कर्मचाऱ्यांनी भिती न बाळगता गुणवत्तापूर्ण कामे करावीत, असेही प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी आज येथे केले.

        जिल्ह्यातील रोहयो कामांची पाहणी केल्यानंतर येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, आमदार ज्ञानराज चौगुले, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, रोहयोचे उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे आणि संबंधित विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

       देशातील काही राज्यांमध्ये रोहयोची मोठ्या प्रमाणात कामे केली जात आहेत. त्याप्रमाणे आपल्या राज्यात आणि जिल्ह्यातही हजारो कोटींची करण्याची गरज आहे. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच विविध स्तरावरील अधिकाऱ्यांनी वैयक्तीक लक्ष घालून आणि सहभाग देऊन कामे करण्याची गरज आहे, असे सांगून श्री. भुमरे म्हणाले, रोहयोअंतर्गत जिल्ह्यात जी कामे घेणे शक्य आहे ती सर्व कामे घेण्यात यावेत. उस्मानाबाद जिल्ह्यात रोहयोच्या कामांना गती देण्यात यावी. जिल्ह्यात रस्ते, तसेच सामूहिक लाभाच्या आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांना मागणी आहे. त्याचे योग्य नियोजन करुन कामे करावीत. बोगस कामे होणार नाहीत याची दक्षता घेऊन गुणवत्तापूर्ण कामे करावीत, आम्ही आपल्या पाठिशी आहोत, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.

      ज्या गावांची रोहयो अंतर्गत कामांची मागणी आहे.त्या गावांमध्ये रोहयोची कामे करण्यात यावीत.वरिष्ठ अधिकारी कामे करण्यास सकारात्मक आहेत पण खालच्या अधिकाऱ्यांनीही स्वत:हून सहभाग घ्यावा,ज्या गावांच्या तक्रारी आहेत तेथे कामे करू नयेत,कामांची गुणवत्ता ठेवून कामे करावी,अशी मागणी खा.ओमराजे यांनी यावेळी केली.लोहारा-उमरगा तालुक्यातील कामांची माहिती देऊन ही कामे करावी,अशी मागणी आमदार चौगुले यांनी केली.

      जिल्हयातील शेतकऱ्यांची मोठया प्रमाणात पाणंद रस्त्यांची मागणी आहे.महसूल प्रशासन त्या दृष्टीने मोठया प्रमाणात शेत रस्ते मुक्त करण्याची मोहिम राबवत आहे.त्यामुळे जिल्हयात पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेच्या  कामांवर प्राधान्य देण्यात येत आहे.जिल्हयात रोहयो अंतर्गत वैयक्तीक तसेच सामूहिक कामांना गती देण्यात येत असून नवीन संकल्पना राबवून यंत्रणांना सक्रिय करण्याचा प्रयत्न केला जाईल,अशी माहिती जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी दिली . श्री. गुप्ता यांनी जि.प.च्या विविध यंत्रणांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली.

      संगणकीय सादरीकरणाव्दारे श्री.कांबळे यांनी रोहयोच्या जिल्हयातील कामांची माहिती दिली.तत्पूर्वी मंत्री श्री. भुमरे यांनी दहिफळ ते दहिफळ पाटी दरम्यान रोहयो अंतर्गत रस्त्यांच्या दूतर्फा वृक्षलागवड कामांचे आणि घनवन वृक्ष लागवड पथदर्शी प्रकल्पाचे उद्घाटन केले.यावेळी खासदार ओमराजे,जि.प.चे.मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता,वाशीचे तहसीलदार श्री.नरसिंग जाधव,वाशी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी  विलास खिलारे,सरपंच सतीश भैरट,ग्रामसेवक ए.बी.कचरे आदी  यावेळी उपस्थित होते. 

From around the web