दुय्यम निरीक्षकासह कर्मचारी आठ हजाराची लाच घेताना जाळ्यात 

राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी झाले लाचेत तर्राट
 
lach

उस्मानाबाद - उमरगा तालुक्यातील एका बियर शॉपीच्या परवान्याच्या नूतनीकरणाचे चलन भरून नुतनीकरण करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरिक्षक व सहाय्यक असलेल्या एका जवानाने ८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन ती दि.७ जून रोजी स्विकारल्याने त्या दोघाविरुद्ध उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उमरगा तालुक्यातील तक्रारदाराची बियर शॉपी असून दुकानाचा परवाना मुदत संपलेली होता. त्यामुळे त्यांनी (तक्रारदार) बियर शॉपीच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी शासकीय चलन भरून परवाना नूतनीकरणासाठी उमरगा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक वर्ग-३ सुमित सुधाकर फावडे (वय - ३१ वर्ष), व जवान म्हणून याच कार्यालयात कार्यरत असलेले वर्ग- ३ श्‍याम किशोर राऊत, (वय ३३ वर्ष) यांच्याकडे दिलेला होता. हा परवाना तक्रारदार यांना देण्यासाठी फावडे व राऊत यांनी ८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती रक्कम राऊत यांनी पंचांसमक्ष स्विकारली. 

या प्रकरणी उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लाचखोर फावडे व राऊत यांना पोलिसांनी गजाआड केले आहे. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक औरंगाबाद विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, उस्मानाबादचे पोलिस उप अधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे यांनी केली. यासाठी त्यांना पोलिस अंमलदार शिवाजी सर्जे, मधुकर जाधव, विष्णू बेळे, विशाल डोके, चालक दत्तात्रय करडे यांनी मदत केली.

कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे संपर्क करावा असे आवाहन पोलिस उप अधीक्षक प्रशांत संपते (मो.नं.९५ २७ ९४ ३१ ००), पोलिस निरीक्षक गौरीशंकर पाबळे, (मो.नं. ८८ ८८ ८१ ३७ २०), पोलिस निरीक्षक अशोक हुलगे (मो.नं. ८६ ५२ ४३ ३३ ९७) यांनी केले आहे.

From around the web