वयोवृध्द, व्याधीग्रस्त व दिव्यांगांचे प्राधान्याने लसीकरण करावे

  - कौस्तुभ दिवेगावकर
 
AS

उस्मानाबाद -  जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने आजपर्यंत कोरोना लसीचा एकही डोस वाया जाऊ दिला नाही . त्यामुळे जिल्ह्यात मिळालेल्या कोरोना लसींचा शंभरटक्के वापर झाला . यापुढेही वयोवृद्ध , व्याधीग्रस्त आणि दिव्यांगांना कोरोना लस प्राधान्याने देण्याबरोबरच नियमप्रमाणेच इतरांनाही लस दिली जावी,  असे निर्देश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे दिले . जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना लसीकरणाच्या अनुषंगाने जिल्हा कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली तेव्हा ते बोलत होते .

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ.एच.व्ही.वडगावे  यांनी जिल्हाधिकारी यांच्या सह सर्व उपस्थितांचे स्वागत करुन प्रस्ताविक केले . १ एप्रिल २०२१ पासून जिल्हयात ४५ वर्षावरील सर्व नागरिकांना करोना लस देण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये कोमॉर्बीड अर्थात  उच्च रक्तदाब, मधुमेह आणि दुर्धर आजार असणाऱ्या नागरिकांचा  यामध्ये समावेश  केले आहे. तसेच ही लस उपकेंद्र स्तरावरही देण्यात येत आहे. ज्या ठिकाणी उपकेंद्राची इमारत, इंटरनेट सेवा, नियमित लसीकरण केंद्रापासून वेगळे आणि  ज्या ठिकाणी उपकेंद्राची लोकसंख्या ५००० असेल अशा ठिकाणी कोव्हीड लसीकरण सुरु करण्यात आले आहे. 

सध्या  ग्रामीण भागात प्रत्येक प्रा.आ.केंद्र अंतर्गत एका गावाची निवड करुन ४४ ठिकाणी ग्राम स्तरावर लसीकरण सत्रे घेण्यात येत आहेत. कोरोना लसीकरण मोहिमे अंतर्गत आजपर्यंत १०७ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला आहे. फ्रंटलाईन वर्कर या संवर्गात १४५ टक्के पहिल्या डोस देण्याचे  काम झाले आहे. वय वर्ष ४५ ते ५९ अंतर्गत नागरिकांना डोस देण्याचे काम २४ टक्के झालेले आहे.तसेच ६० वर्षापुढील ६० टक्के ज्येष्ठ नागररिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण झालेले आहे , अशी माहिती डॉ . वडगावे यांनी यावेळी दिली .

 जिल्ह्यातील कोमॉर्बीड  अर्थात  उच्च रक्तदाब, मधुमेह आणि  दुर्धर आजार असणाऱ्या नागरीक, दिव्यांग व्यक्ति यांचे प्राधान्याने कोरोना लसीकरण १०० टक्के पूर्ण करुन घ्यावे , असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी श्री . दिवेगावकर यांनी  शहरी भागात वॉर्ड निहाय लसीकरण सत्रांचे सुयोग्य नियोजन करुन स्थानिक प्रशासन (नगर पालीका/परिषद) यांच्या समन्वय आणि सहकार्याने वॉर्ड निहाय लसीकरण सत्राचे आयोजन करुन लसीकरण पूर्ण करुन घ्यावे , असे सांगितले. जिल्ह्यातील ऊस तोड कामगार ,  स्थलांतरीत लोकसंख्या, फिरती लोकसंख्या (उदः पारधी पेढी) इत्यादी ठिकाणी लसीकरण सत्राचे आयोजन करुन  या घटकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आदेशही श्री . दिवेगावकर यांनी यावेळी दिले .

या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवले , निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, कोरोना संबंधी नोडल अधिकारी डॉ.इस्माईल कासम मुल्ला,  डॉ.शिवकुमार हलकुडे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवकुमार हळकुंडे, युनिसेफचे डॉ.राजेश कुकडे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. गजानन परळीकर   यांचेसह आरोग्य विभागाचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. 
 

From around the web