उस्मानाबाद येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार 

-उच्च व तंत्रशिक्षण उदय सामंत
 
s

उस्मानाबाद  - जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना एमपीएससी व युपीएससी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता यावा यासाठी उस्मानाबाद येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.१३ ऑगस्ट रोजी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे पर्यावरण मंत्री तथा युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) अंतर्गत जिल्ह्यासाठी देण्यात येणाऱ्या व्हेंटिलेटर लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, शिवसेना जिल्हा उपप्रमुख गौतम लटके आदी उपस्थित होते. 

पुढे बोलताना ना. सामंत म्हणाले की, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू करण्यासाठी ५ कोटी रुपये निधी लागणार असून त्यासाठी नगर परिषदेने जागा उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच येथील पॉलिटेक्निकल महाविद्यालयाच्या जागेपैकी २० एकर जागेवर नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शेळी, ज्वारी व इतर उपक्रम सुरू करण्यासाठी २० ते २५ कोटी रुपये लागणार असून तो उपक्रम येत्या ६ महिन्यांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असलेली जागा जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलावीत असे आवाहन त्यांनी केले. 

विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र उस्मानाबाद येथे असून त्याचे पूर्ण विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी येत्या एक महिन्यांमध्ये मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेण्यात येणार आहे. तर डॉ. माशाळकर समितीचा अभ्यास करून पावले उचलण्यात येणार असून केंद्र सरकारच्या याबाबत असलेल्या भूमिकेचा देखील विचार केला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 

 विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया तात्काळ होणारी नसून ती दीर्घ स्वरूपाची आहे. जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते मंडळींच्या मागणीचा विचार करून त्या दृष्टीने पावले उचलली जाणार असल्याचे त्यांनी  आश्वासन दिले. तर जिल्ह्यातील महाविद्यालय सुरू करण्याबाबत ते म्हणाले की, २० ते २५ टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. तसेच याबाबत जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांनी लसीकरणाची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा. तर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काही बँका शैक्षणिक लो देण्यास टाळाटाळ करीत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता ते म्हणाले की संबंधित बँका वर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी व विद्यार्थी व पर्यायाने पालकांच्या समस्यांची सोडवणूक करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

From around the web