ई - पीक पाहणी निमित्त हडोंग्री येथे जिल्हाधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी संवाद
उस्मानाबाद - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी भूम तालुक्यातील हडोंग्री येथील शेतकरी शामप्रसाद वाघमारे यांच्या शेतास भेट देऊन तेथे चालू असलेल्या ई-पीक पाहणीच्या कामाची आज पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी तेथे उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि ई-पीक पाहणी प्रकल्पाचे महत्त्व विशद केले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी रूपाली आवले , उपविभागीय अधिकारी सचिन गीरी, तहसीलदार श्रीमती उषाकिरण श्रृंगारे, अधीक्षक कृषी अधिकारी उमेश बिराजदार, इतर अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
ई-पीक पाहणी ही शासन निर्णय दि.30 जुलै 2021 अन्वये पीक पेरणीची माहिती भ्रमणध्वनी वरील ॲपव्दारा(Mobile App) गा.नं.नं.12 मध्ये नोंदविण्यासाठी स्व्त: शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे . सध्या आपल्या जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी आणि प्राधिकारी यांना ई - पीक पहाणीचे दिशानिर्देश देण्यात आले आहेत.
हे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्हयातील शेतकरी खातेदारांचा कृषी पथपुरवठा सुलभ होईल, पीक विमा आणि पीक पाहणी दावे तात्काळ निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल , नैसर्गीक आपत्तीमुळे पीकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत होईल.त्यामुळे 15 ऑगस्ट 2021 पासून जिल्हयातील शेतकरी खातेदार यांनी “ ई-पीक पाहणी ” ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये आपली माहिती अचूक भरावी असे आवाहन श्री. दिवेगावकर यांनी यापूर्वी केले आहे.