उस्मानाबाद शहरात जनता कर्फ्युची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
उस्मानाबाद - कोविडच्या रुग्णांची जिल्ह्यातील वाढती संख्या लक्ष्यात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जाहीर केलेल्या जनता कर्फ्युला आज उस्मानाबाद शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या जनता कर्फ्युची शहरातील विविध भागास भेट देऊन त्यांनी सकाळी दहा वाजता पाहणीही केली. दरम्यान, कॉविडच्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या उपाय योजनाना राबवण्यास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
शहरातील शिवाजी महाराज चौक ते खाजा नगर , नेहरू चौक , काळा मारुती चौक, बार्शी नाका, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत ते पुन्हा शिवाजी महाराज चौक आदी ठिकाणी श्री. दिवेगावकर यांनी या जनता कर्फ्युची पाहणी केली. शहरातील बाजार पेठ , दुकाने आणि व्यवसाय बंद ठेऊन नागरिकांनी या जनता कर्फ्युला उत्तम प्रतिसाद दिल्याचे त्यांना पहावयास मिळाले. कोविडला घालवण्यासाठी जनतेने कॉविडच्या लक्षणं दिसताच कोविड चाचणी करून घ्यावी, अंगावर आजर कडू नये. त्यामुळे आजार बळावून त्याची संपर्कात अलेल्याना लागण होऊन या साथीच्या रुग्णांची संख्या वाडू शकते. नागरिकांनी कोविड लस घेण्यासाठीही प्रतिसाद द्यावा. त्यासाठी लस देण्याच्या केंद्रात वाढ केली आहे, सत्रही वाढवले आहेत. ही लास आता शहरातील शासकीय रुग्णालयाबरोबरच ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहे तसेच काही खाजगी रुग्णालयातही माफक किमतीत घेता येते तेव्हा रीतसर नोंद करून किंवा प्रत्येक्ष केंद्रात जाऊन कॉविडची लस घ्यावी, असेही आवाहन श्री. दिवेगावकर यांनी केले आहे.
उस्मानाबाद शहरातील कर्फ्युची पाहणी करताना जिल्हाधिकारी यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, निवासी उपजिल्हाधिकारी स्वामी, उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड, उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी, नगरपालिकेचे मुख्यधिकारी हरिकल्याण येलगट्टे, शहर पोलिस ठाण्याचे श्री. बुधवंत, आनंदनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री .चव्हाण आदी उपस्थित होते.