जिल्हा स्वीप नोडल समितीच्या बैठकीत निवडणूक विषयक प्रसिध्दीबाबत चर्चा

 
s

  उस्मानाबाद - भारत निवडणूक आयोगाने पुरस्कृत केलेल्या स्वीप नोडल समितीच्या बैठकीत शासनाच्या विविध विभागातर्फे निवडणूक विषयक कामांच्या प्रसिध्दीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रामुख्याने ऑनलाईन आणि डिजिटल स्वरुपात स्वीपची कामे करण्यावर भर देण्यात यावा,असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.प्रताप काळे यांनी यावेळी सांगितले.

        जिल्हयातील प्रत्येक शाळेत निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करण्यात आले आहेत.परंतु दरम्यानच्या काळात शिक्षकांच्या बदल्या झाल्या असतील किंवा काही शिक्षक निवृत्त झाले असतील तर निवडणूक साक्षरता मंडळाच्या निवडणूक आयोगाच्या यादीप्रमाणे तपासणी करुन शिक्षकांची नावे निश्चित करण्याचे काम शिक्षणाधिकारी यांनी करावे,असे सांगून डॉ.काळे यांनी निवडणूक साक्षरता मंडळीची एक बैठक ऑनलाईन स्वरुपात आयोजित करावी.कृषी महाविद्यालयांचाही जिल्हा स्वीप नोडल समितीत समावेश करण्यात आला असल्याने संबंधित महाविद्यालयांनी स्वीपचे उपक्रम आपल्या महाविद्यालयात राबवावेत,असेही ते म्हणाले.

        भारत निवडणूक आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन किंवा शक्य असेल तर ऑफलाईन निबंध,प्रश्नमंजूषा,घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्याप्रमाणे शिक्षण अधिकारी माध्यमिक यांनी याबाबत कार्यवाही करावी.त्यासंबंधिचा अहवाल सादर करावा,असे सांगून डॉ.काळे म्हणाले महिला व बाल विकास अधिकारी यांनी बचत गटांच्या महिलांमध्ये मतदार जागृती बाबतचे उपक्रम घ्यावेत. नेहरु युवा केंद्राने त्यांच्या कार्यक्रमातून स्वीपला प्राधान्य द्यावे.स्वीपची प्रक्रिया ही सतत चालणारी असल्याने यात सर्वांनी सहभाग घ्यावा.येत्या एक नोव्हेंबर ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.तथापि,मतदार नोंदणीची  प्रक्रिया सध्याही ऑनलाईन करता येते.त्याचाही पात्र नागरिकांनी लाभ घ्यावे,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

     या बैठकीस माध्यमिक शिक्षण अधिकारी गजानन सुसर,शासकीय तंत्र निकेतनचे प्राचार्य डॉ.दि.म.घायतिडक,आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी उन्मेश वाळींबे,जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी,किणी येथील शासकीय कृषी महाविद्यालयाचे डॉ.किरण थोरात,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे नदिम शेख,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी.एच.निपाणीकर,टी.एम.काझी,नायब तहसीलदार (निवडणूक) चेतन पाटील आदी उपस्थित होते.

From around the web