गिरीश कुबेरांच्या वादग्रस्त पुस्तकावर बंदी घालण्याची उस्मानाबादेत मागणी 

 
a

उस्मानाबाद -  लोकसत्ताचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’  ( Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra )  या पुस्तकावरून वाद सुरू झाला आहे.  कुबेर यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह लिखाण  या पुस्तकामध्ये केले असून या पुस्तकावर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज साहित्यिक होते. संस्कृत भाषेवर त्यांचं प्रभुत्व होते. चारित्र्यसंपन्न व स्वराज्यनिष्ठ राजांवर रयतेचं सुध्दा प्रचंड प्रेम होते. अशा छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणं हा जाणीवपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे. छ.संभाजी महाराजांच्या विरोधात अनाजीपंत यांनी ज्या पध्दतीने षडयंत्र करून छत्रपती संभाजी महाराजांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्याच पध्दतीने छ. संभाजी महाराजांचे चारित्र्यहनन करण्याचं काम आजही कथा, कादंबऱ्या, मालिका व पुस्तकातून वेळोवेळी होत आहे. परंतू छत्रपती शिवाजी महाराज, छ.संभाजी महाराज यांच्या कृती आणि विचारांचे मावळे म्हणून आम्ही छत्रपतींची बदनामी सहन करणार नाही. या पुस्तकामुळे आगामी काळात महाराष्ट्राला अस्थिरतेचा धोका निर्माण होऊ शकतो. 

कुबेर यांचे लेखन समस्त महाराष्ट्रवासियांची मान शरमेने खाली जाईल असेच आहे. त्यामुळे आम्हा सर्व इतिहास संशोधक व अभ्यासक यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. माझी आपल्याला विनंती राहील की 'रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावर राज्यासह संपूर्ण देशात कायमची बंदी घालण्यात यावी. तसेच आजघडीला बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेली ती सर्व पुस्तके शासनाच्या ताब्यात घ्यावीत.तसेच जोपर्यंत लेखक गिरिश कुबेर आणि प्रकाशक  हार्पर कॉलिंस हा वादग्रस्त मजकूर पुस्तकातून काढून टाकत नाहीत. तोपर्यंत महाराष्ट्र शासनाने सर्व वितरकांना हे पुस्तक शासन दरबारी जमा करण्याचे आदेश द्यावेत.

 विशेष म्हणजे कुबेर हे एका दैनिकाचे संपादक म्हणून ओळखले जातात. ते अभ्यासून प्रकटतात असेही बोलले जाते. ते छ. संभाजी महाराजांविषयी आज्ञानातून लेखन करतील असे वाटत नाही. त्यामुळे कुबेर हे या त्यांच्या पुस्तकात छ. संभाजी महाराजांविषयी असे बिनबुडाचे लिखाण करतात या मागे त्यांचा हेतू काय आहे ? याचीही चौकशी झाली पाहीजे.  या संवेदनशील विषयांमध्ये लवकरात लवकर लक्ष घालून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा कुबेर व प्रकाशक हार्पर कोलिन्स यांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा सज्जड इशारा देण्यात आला आहे. यावर जिल्हाध्यक्ष ॲड. तानाजी चौधरी, प्रदेश संघटक अतुल गायकवाड, जिल्हा सचिव आशिष पाटील, तालुकाध्यक्ष संदीप लाकाळ (उस्मानाबाद)  बालाजी नाईकनवरे (कळंब), हनुमान हुंबे (भूम), प्रदीप जाधव (उमरगा), दिनेश चौगुले (वाशी), सर्जेराव गायकवाड (तुळजापूर), राजकुमार देशमुख (परंडा), धनराज बिराजदार (लोहारा), जिल्हा उपाध्यक्ष मनोज लोमटे-पाटील, आकाश मुंडे, विकास गडकर-पाटील, उस्मानाबाद ‌ शहराध्यक्ष आदित्य देशमुख ,कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्ता कवडे, सचिव प्रशांत शेळके व प्रसिद्धी प्रमुख शिवदास पवार यांच्या सह्या आहेत.

From around the web