अणदूरमध्ये हातभट्टी दारूचा महापूर

गोरगरिबांचे संसार उध्वस्त तर पोलिसांचे संसार फुलले
 
s

अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर गावात नळदुर्ग पोलिसांच्या आशीर्वादामुळे हातभट्टी दारूचा महापूर आला आहे. दारूमुळे अनेक गोरगरिबांचे संसार उध्वस्त झाले आहेत तर बिट अंमलदार आंणि सपोनिचा संसार फुलला आहे .

अणदूर गावाची ओळख माजी आमदार आणि माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे गाव म्हणून आहे. पण या गावात दारू, मटका, जुगार आदी अवैध धंदे बोकाळले आहेत. गावात जवळपास १५ ते १६ ठिकाणी हातभट्टीची गावठी दारू राजरोस विकली जात असताना, पोलीस गांधारीप्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधून गप्प आहेत.

या दारूमुळे गोरगरिबांचे संसार उध्वस्त झाले आहेत तर पोलिसांचे संसार फुलले आहेत. या गावासाठी नेमण्यात आलेला बिट अंमलदार अनेक वर्षांपासून तळ ठोकून एकाच ठिकाणी आहे. काही दिवसापूर्वी अनेक बिट अंमलदाराच्या बदल्या करण्यात आल्या, अणदूरच्या या बिट अंमलदाराची साहेबानी बदली केली नाही. हा बिट अंमलदार सर्व अवैध धंदेवाल्याकडून कलेक्शन करून, साहेबाना पोहच करीत असल्याने तरी भी चूप, मेरी भी चूप असा प्रकार सुरु आहे.

या गावात हातभट्टीची दारू नळदुर्गजवळील पाटील तांड्यावरून येत आहे. भल्या पहाटेच दारूच्या ट्यूब जात असताना, एकदाही पोलिसांना त्या दिसल्या नाहीत. दारूबरोबर मटकाही जोरात सुरु आहेत. मटक्यामुळे 'ओपन जेवू देईना , क्लोज झोपू देईना' , अशी मटकाबहाद्दरांची अवस्था झाली आहे.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या डोळ्यात धूळफेक करून, नळदुर्गच्या साहेबानी आपल्या कार्यकाळात लाखो रुपयाची माया जमविली असून, त्याची रीतसर तक्रार एसीबीकडे करण्यात येणार आहे.

From around the web