बेंबळी-बरमगाव-पाटोदा रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी आमरण उपोषण

 
x

उस्मानाबाद  - तालुक्‍यातील बेंबळी-बरमगाव-पाटोदा रस्त्याच्या मजबुतीकरणाचे रखडलेले काम करण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.९ ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी-बरमगाव-पाटोदा या रस्त्याच्या कामाचे टेंडर घेऊन जवळपास ३ वर्षे पूर्ण झालेली आहेत. या कामाची आज रोजी अत्यंत वाईट परिस्थिती झाली असून या रस्त्यावर दररोज अपघात घडत आहेत. मात्र बांधकाम विभागाच्या संबंधित कार्यालयाकडून या कामासंबंधी ठेकेदाराकडून काम करून घेण्याची कुवत नाही असे दिसून येत आहे. विशेष म्हणजे कार्यकारी अभियंता हे संबंधित ठेकेदारावर कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नसल्यामुळे ही अत्यंत वाईट बाब आहे. तर या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांमुळे येणाऱ्या काळात कोणाचा मृत्यू झाला तर त्याची सर्व जबाबदारी कार्यकारी अभियंत्यांची राहील व संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. 

या कामाच्या ठेकेदारा सोबत बांधकाम विभागातील अभियंत्याचे कोणत्या प्रकारचे संबंध आहेत का ? त्यांनी संबंधित ठेकेदाराकडून वेळेत काम पूर्ण करून घेतले नाही, त्यांचे नाव काळ्या यादीत का टाकले नाही ? याचे उत्तर या विभागातील अधिकाऱ्यांनी जनतेला द्यावे, अशी मागणी देखील उपोषणकर्त्यांनी केले असून या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. या उपोषणासाठी छावाचे युवक जिल्हाध्यक्ष कालिदास गायकवाड, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष दत्ता ढोले, शंकर गवळी, अजय राजगुरू व बापू माने आदींनी उपोषण सुरू केले आहे.

From around the web