तारीख पे तारीख : धाराशिव नामांतराची सुनावणी पुढे ढकलली , हा आदेश मात्र कायम ... 

 
dharashiv

मुंबई - उस्मानाबाद जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव हे धाराशिव न वापरता उस्मानाबाद वापरा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने २० एप्रिल रोजी दिले होते.  तोच आदेश कायम ठेवत धाराशिव नामांतराची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता पुढील सुनावणी १४ जून रोजी होणार आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने जाता -जाता उस्मानाबादचे नामांतर धाराशिव आणि औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर केले होते. त्यानंतर शिंदे – फडणवीस सरकराने त्यात थोडासा बदल करून उस्मानाबादचे नामांतर धाराशिव आणि औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केले होते. त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात नामांतरास हरकत घेणारी याचिका दाखल करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात नामांतरास हरकत घेणारी याचिका  मसूद शेख व इतर (PIL १७३/२०२२ ) आणि  खलील सय्यद ( PIL ११०/२०२२) अश्या एकूण १९ याचिका  दाखल करण्यात आल्या आहेत.त्याची एकत्र सुनावणी आज ( ६ जून ) रोजी होणार होती, त्यासाठी याचिकेकर्ते मसूद शेख मुंबईला गेले होते. त्यांनी सांगितले की,  उस्मानाबाद नामांतर जनहित याचिकामधे आज अंतरिम मुख्य न्यायमुर्ती नितीन जामदार व संदीप मारणे यांच्या खंडपीठसमोर सुनावणी झाली,या मध्ये स्थगिती आदेश नियमित करून पुढील सुनावणी १४ जून रोजी ठेवण्यात आली आहे. 

शहराचे नाव 'धाराशिव' कायम आहे, पण तालुका आणि जिल्ह्याचे नाव उस्मानाबाद असे कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील नगर परिषद आणि बसस्थानक यास धाराशिव नाव देण्यात आले आहे, पण इतर कोणत्याही शासकीय कार्यालयास धाराशिव नाव वापरता येणार नाही किंवा शासन आदेशात धाराशिव नव्हे उस्मानाबाद नाव वापरावे लागणार आहे. 

काय आहे प्रकरण ? 

 १९०४ सालापर्यंत निजाम राजवटीत धाराशिव शहर हे नळदुर्ग जिल्ह्यात अंतर्भूत होते. परंतु १९०४ धाराशिव जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले. धाराशिव शहराला निजामाचा शेवटचा राजा मीर उस्मान याच्या आठवणीत उस्मानाबाद हे नाव देण्यात आले होते. परंतु त्यापूर्वी या शहराचे नाव धाराशिव असेच असल्याचे अनेक पुरावे आढळून आले आहेत.

असे म्हटले जाते की, प्राचीन काळात धारासूर नावाचा एक राक्षस होता. या राक्षसाने प्रजेला खूप त्रास दिला होता परंतु एके दिवशी देवीने वध केला. यानंतर या देवीला धारासूर मर्दिनी म्हणले गेले. धारासूर मर्दिनी ग्रामदेवता असल्यामुळे तिच्या नावावरून धाराशिव असे नाव ठेवण्यात आले. कालांतराने या नावाचे रूपांतर उस्मानाबादमध्ये झाले.

उस्मानाबाद शहराचे नाव बदलण्यात यावे ही मागणी खूप पूर्वीपासूनची होती. १९६२ साली या मागणीने जोर धरला होता असे पुरावे आढळून आले आहेत. जेव्हा जेव्हा नवीन सरकार स्थापन झालं त्यावेळी उस्मानाबाद शहराचे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारने नामांतराचा प्रस्ताव देखील मंजूर केला होता.

त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने जाता -जाता उस्मानाबादचे नामांतर धाराशिव आणि औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर केले होते. त्यानंतर शिंदे – फडणवीस सरकराने त्यात थोडासा बदल करून उस्मानाबादचे नामांतर धाराशिव आणि औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केले होते. त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात नामांतरास हरकत घेणारी याचिका दाखल करण्यात आली आहे.धाराशिव नामांतर विरोधी याचिका शेख मसूद व इतर १९ आणि खलील सय्यद यांनी दाखल केली आहे.

या याचिकेची सुनावणी २० एप्रिल रोजी झाली . यावेळी याचिकाकर्त्यांचे वकील ऍड. प्रज्ञा तळेकर यांनी न्यायालयात सांगितले की, फक्त उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्यात आले आहे. तालुका आणि जिल्हा उस्मानाबाद असेच आहे, तरीही महसूल आणि इतर विभागाचे अधिकारी आपल्या कामकाजात तालुका आणि जिल्ह्याचे नाव उस्मानाबाद लिहीत आहेत. त्यावर न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत तालुका आणि जिल्ह्याचे नाव उस्मानाबाद असेच लिहावे , असे निर्देश दिले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी, एक आदेश काढून महसूल आणि इतर कार्यालयांनी पुढील आदेश येईपर्यंत तालुका आणि जिल्ह्याचे नाव उस्मानाबाद असेच लिहावे, असे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशाची काटेकोर अमंलबजावणी करावी, असेही सूचित केले आहे.

From around the web